Pro Kabaddi League 2021-22 Day 2 Preview: कोरोनाच्या व्यत्ययानंतर अखेर प्रो कबड्डीचा नवा हंगाम काल सुरू झाला. यू मुंबा आणि गतविजेते बंगाल वॉरियर्स यांनी विजयी सलामी दिली. तर तमिळ थलायवाज आणि तेलुगू टायटन्समधील सामना बरोबरीत सुटला. आजदेखील स्पर्धेत तीन सामने रंगणार आहेत. पहिल्या सामना गुजरात विरूद्ध जयपूरचा असेल. त्यानंतर पुणेरी पलटण दिल्लीच्या दबंग संघासमोर उभी ठाकेल. आणि तिसऱ्या सामन्यात हरयाणा आणि पटणा हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पाहूया या दोन संघांचा एकमेकांविरूद्धचा इतिहास...
गुजरात जायंट्स विरूद्ध जयपूर पिंक पॅँथर्स - हे दोन संघ एकमेकांसमोर संध्याकाळी ७.३० वाजता मैदानात उतरणार आहेत. गुजरात आणि जयपूर एकमेकांसमोर आतापर्यंत आठ वेळा आले असून त्यात गुजरातचं पारडं जड आहे. गुजरातने तब्बल पाच वेळा बाजी मारली आहे तर जयपूरला केवळ दोन वेळा विजय मिळवता आला आहे. एकदा त्यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे जयपूरच्या संघाला जर आज विजयी सुरूवात करायची असेल तर त्यांना स्पर्धेचा इतिहास विसरून गुजरात जायंट्सविरूद्ध दमदार चढाई करणं आवश्यक आहे.
दबंग दिल्ली विरूद्ध पुणेरी पलटण - प्रो कबड्डीच्या इतिहासात पुणेरी पलटण दिल्लीच्या संघासमोर तब्बल १६ वेळा मैदानात उतरली आहे. या दोन संघांमध्ये नेहमीच काँटे की टक्कर पाहायला मिळते. १६ पैकी आठ वेळा पुणेरी पलटणने तर सात वेळा दबंग दिल्लीने सामन्यात बाजी मारली आहे. तर एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली पुण्याची बरोबरी करणार की पुणेरी पलटण पुन्हा एकदा बाजी मारणार याकडेच साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
हरयाणा स्टीलर्स विरूद्ध पटणा पायरेट्स - या दोन संघांमध्ये प्रो कबड्डी स्पर्धेत फारसे सामने झालेले नाहीत. हे दोन संघ केवळ पाच वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यातही तीन वेळा हरयाणाने तर एकदा पटणा संघाने विजय मिळवला होता. एक सामना दोन्ही संघांनी बरोबरीत सोडवला होता. त्यामुळे आजच्या तिसऱ्या सामन्यात नक्की कोणता संघ कोणावर भारी पडणार यावर साऱ्यांचीच नजर असेल.
आजचे सामने-
गुजरात जायंट्स विरूद्ध जयपूर पिंक पँथर्स - संध्याकाळी ७.३० वाजतादबंग दिल्ली विरूद्ध पुणेरी पलटण - रात्री ८.३० वाजताहरयाणा स्टीलर्स विरूद्ध पटणा पायरेट्स - रात्री ९.३० वाजता