Pro Kabaddi League 2021-22 Day 3 Live Updates : स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तीनही सामने अटीतटीचे झाले. पहिल्या सामन्यात कधी दिल्ली पुढे तर कधी मुंबई पुढे असा सामना सुरू असताना हळूच दबंग दिल्लीने यू मुंबावर मात केली. त्यानंतरच्या सामन्यात बंगळुरू बुल्सने सांघिक कौशल्य दाखवत तमिळ थलायवाजला नमवलं. आणि शेवटच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने दुसरा विजय मिळवत लौकिलाला साजेसा खेळ केला.
दिल्लीचे 'दबंग' यू मुंबावर पडले भारी (३१-२७)
सामना सुरू झाल्यापासूनच दोन्ही संघ आक्रमक पवित्र्यात होते. सुरूवातीला बरोबरीत सुरू असलेला सामना हाफ टाईमपर्यंत दोन गुणांच्या फरकाने यू मुंबाकडे झुकला होता. पण त्यानंतर सामन्यात खरी रंगत आली. यू मुंबा एकेवेळी २०-१२ अशी आघाडीवर असताना नवीन कुमारच्या दमदार चढाईमुळे सामना पलटला. झटपट गुण मिळवत दबंग दिल्ली २०-२० अशी बरोबरीवर आली. त्यानंतर यू मुंबाला गुण मिळवणं कठीण जाऊ लागलं पण दुसरीकडे दिल्लीकर मुंबईवर चढाई करतच राहिले. त्यामुळे अखेर ३१-२७ अशा फरकाने दबंग दिल्लीने स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. तसेच, नवीन कुमारनेही सर्वात जलद ५०० रेड पॉईंट्स मिळवण्याचा विक्रम साजरा केला.
बंगळुरू बुल्सची तमिळ थलावयाज 'चढाई' (३८-३०)
बंगळुरू बुल्सला पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागल्याने आजचा विजय त्यांच्यासाठी आवश्यक होता. त्यांच्यासमोर पहिला सामना बरोबरीत सोडवलेले तमिळ थलायवाज होते. बंगळुरूच्या संघाने चढाई आणि बचाव अशा दोन्ही गोष्टीत सांघिक कामगिरी दाखवत दमदार खेळ केला. पवन कुमारने ९ रेड पॉईंट्स मिळवले तर सौरभ नंदलने सर्वाधिक ५ टॅकल पॉईंट्स घेत त्याला उत्तम साथ दिली आणि संघाला विजय मिळवून दिला.
बंगाल वॉरियर्सने गुजरात जायंट्स पाजलं पराभवाचं पाणी (३१-२८)
गतविजेते बंगाल वॉरियर्स पहिल्या सामन्यात विजय मिळवून आज गुजराजपुढे मैदानात उतरले होते. गुजरातशी त्यांची टक्कर अगदी अटीतटीची झाली. दोन्ही संघांमध्ये सुरूवातीपासूनच गुणांचे अंतर अगदी कमी होते. त्यामुळे सामना नक्की कोणाच्या दिशेने झुकणार याचा अंदाज चाहत्यांना येतच नव्हता. पण कर्णधार मणिंदर सिंगच्या ७ रेड पॉईंट्सच्या जोरावर बंगालने सामना जिंकला.