Pro Kabaddi League 2021-22: स्पर्धेत बुधवारी दोन सामने खेळले गेले. त्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला. हरयाणा स्टीलर्स आणि यूपी योद्धा या संघांनी ३६-३६ गुण करत सामना बरोबरीत सोडवला. रेड पॉईंट्समध्येही दोन्ही संघांना समान गुण मिळाले. हरयाणाकडून रेडर विकास कंदोलाने सर्वाधिक १७ तर यूपी योद्धाकडून रेडर सुरेंद्र गिलने १४ पॉईंट्सची कमाई केली. दुसऱ्या सामन्यात मात्र बंगळुरू बुल्स दबंग दिल्लीवर खूपच भारी पडले. बंगळुरूने दिल्लीला दुपटीपेक्षाही जास्त अंतराने पराभूत केले.
बंगळुरूच्या संघाने दिल्लीला जराही दबंगगिरी करण्याची संधी दिली नाही. संपूर्ण सामन्यावर त्यांनी आपलं वर्चव्स राखलं आणि दिल्ली तब्बल दुपटीपेक्षाही जास्त म्हणजे ३९ गुणांच्या फरकाने पराभूत केलं. बंगळुरूने दिल्लीला ६१-२२ अशी एकतर्फी धूळ चारली. यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा पराभव ठरला.
पवनने गाठला १०० रेड पॉईंट्सचा टप्पा-
सामन्यात बंगळुरूच्या संघाने ३५ रेड पॉईंड्स आणि १५ टॅकल पॉईंट्सची कमाई केली. सगळ्याच आघाड्यांवर बंगळुरूचा संघ दिल्लीवर भारी पडला. दिल्लीच्या संघाला एकूण १६ रेड पॉईंट्स आणि ४ टॅकल पॉईंट्सची कमाई करणं शक्य झालं. सामन्यात बंगळुरूचा रेडर पवन सेहरावतने धडाकेबाज कामगिरी केली. त्याने दिल्लीच्या संपूर्ण संघापेक्षाही जास्त गुण कमावले आणि संघाला हंगामातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. तसेच पवनने १०० रेड पॉईंट्सचा टप्पाही पार केला.