Pro Kabaddi League 2021-22 Season 8 Day 1 Live Updates : प्रो कबड्डी स्पर्धेच्या आठव्या हंगामाची सुरूवात यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स यांच्या सामन्याने झाली. सलामीच्या सामन्यातच यू मुंबाने आपला दम दाखवत बंगळुरूला पराभूत केले. दुसरा सामना मात्र बरोबरीत सुटला. तमिळ थलायवाज आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील हा स्पर्धेच्या इतिहासातील चौथा टाय सामना ठरला. पण तिसऱ्या सामन्यात मात्र गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने विजयी लय कायम राखत यूपी योद्धाला पराभवाची चव चाखायला भाग पाडले.
यू मुंबा बंगळुरू बुल्सवर भारी (४६-३०)
यू मुंबाच्या खेळाडूंनी सुरूवातीच्या पाच मिनिटांत अपेक्षित खेळ केला नाही. बंगळुरूचा संघ पटापट गुण मिळवत होता. पण यू मुंबाच्या अभिषेक सिंगने एका चढाईत बंगळुरूला ऑल आऊट केलं आणि तेथून सामना फिरला. त्यानंतर बंगळुरूच्या संघात अभिषेक सिंग चांगलाच भारी पडला. त्याने १५ रेड पॉईंट्स आणि ४ बोनस पॉईंट्ससह १९ गुण मिळवले. बंगळुरू संघाला कर्णधार पवन सेहरावतकडून अपेक्षा होत्या, पण त्याला म्हणावी तशी चांगली कामगिरी जमली नाही. त्याने ७ रेड पॉईंट्ससह १२ गुण मिळवले. चंद्रन रंजनची कामगिरी त्याच्यापेक्षा चांगली झाली. रंजनने ९ रेड पॉईंट्ससह १३ गुण मिळवले. पण अभिषेक सिंगच्या चढाईपुढे बंगळुरू बुल्स मात्र नेस्तनाबूत झाले आणि त्यांना तब्बल १६ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला.
तेलुगू टायटन्स-तमिळ थलायवाज सामना बरोबरीत (४०-४०)
दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. सुरूवातीचपासूनच दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. हाफ टाईममध्ये तमिळ थलायवाज २३-२१ असे आघाडीवर होते. पण उत्तरार्धात अखेर सामना बरोबरीत सुटला. तेलगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने ८ रेड पॉईंट्ससह ११ गुण कमावले. तर तमिळ थलायवाजच्या मनजीतने ९ रेड पॉईंट्ससह १२ गुण मिळवले.
गतविजेच्या बंगालची यूपी योद्धा संघावर मात (३८-३३)
गेल्या वर्षीचे विजेते बंगाल वॉरियर्सने आपल्या लौकिलाला साजेसा खेळ करत पहिल्या सामन्यात यूपी योद्धा संघाला पराभूत केले. १ कोटींपेक्षा जास्तीची बोली लावून विकत घेतलेल्या प्रदीप नरवालला यूपी योद्धा संघाला संकटातून बाहेर काढणं जमलं नाही. प्रदीप नरवालने यूपी योद्धा संघाकडून सर्वाधिक ८ गुण कमावले. पण बंगालचा इस्माईल नबीबक्ष त्यांच्यावर भारी पडला. त्याने अप्रतिम अष्टपैलू खेळ केला. ७ रेड पॉईंट्स, ३ टॅकल पॉईंट्स आणि १ बोनससह त्याने सर्वाधिक ११ गुण मिळवत संघाला विजयी सलामी मिळवून दिली.