Pro Kabaddi League 2021-22: प्रो-कबड्डीच्या गेल्या हंगामातील विजेता बंगाल वॉरियर्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. पाटणा पायरेट्सने ४४-३० अशा मोठ्या फरकाने बंगाल संघाला मात दिली. त्याआधी पुणेरी पलटण संघानेही पराभवाची चव चाखावी लागली. पुणेरी पलटणला तमिळ थलायवाज संघाला ३६-२६ असे पराभूत केले. या विजयासह पाटणा पायरेट्स गुणतालिकेत दुसऱ्या तर तमिळ थलायवाज संघ सहाव्या क्रमांकावर विराजमान झाला.
तमिळ थलायवाजने पुणेरी पलटणला दिलं धोबीपछाड (३६-२६)
पुणेरी पलटण संघाने गेल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे या सामन्यात विजयी लयीवर परतण्याची त्यांची अपेक्षा होती पण तमिळ थलायवाजने पुण्याला पराभूत केले. मराठमोळ्या अजिंक्य पवारने ९ रेड पॉईंट्ससह ११ गुण मिळवले. पुणेरी पलटणकडून पूर्वार्धात चांगला प्रतिकार पाहायला मिळाला पण नंतर मात्र त्यांना गुणांमधलं अंतर कमी करता आलं नाही.
----
गतिवजेत्या बंगालचा पुन्हा झाला पराभव (४४-३०)
पाटणा आणि बंगाल यांच्यातील सामना खूपच रंगतदार झाला. पाटणा संघाने सुरूवात संथ केली होती. हाफ टाईमपर्यंत त्यांचा संघ पाच गुणांनी पिछाडीवर होता. पण उत्तरार्धात मात्र मनू गोयतने सामना फिरवला. त्याने संपूर्ण सामन्यात ७ रेड, ३ टॅकल आणि ५ बोनस पॉईंट्ससह १५ गुणांची कमाई केली. त्याच्या जोरावर त्यांनी संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. बंगालचा संघ मात्र मनू गोयतच्या चढाईतून मिळालेल्या धक्क्यातून सावरूच शकला नाही. त्यामुळे बंगालला सलग दुसऱ्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.