Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात यू मुंबा ( U Mumba) आणि हरयाणा स्टीलर्स ( Haryana Steelers) यांच्यातला सामना बरोबरीत सुटला, तर तामिळ थलायव्हाज ( Tamil Thalaivas) नं चुरशीच्या सामन्यात यूपी योद्धा ( UP Yoddha) संघाचा पराभव केला. पण, आजचा दिवस प्रदीप नरवालचा ( Pradeep Narwal) राहिला. त्यानं PKL च्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. यूपी योद्धाच्या या खेळाडूनं असा पराक्रम केला जो आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही.
आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात हरयाणानं पहिल्या हाफमध्ये १२-१० अशी आघाडी घेऊनही यू मुंबानं त्यांना २४-२४ असे बरोबरीत रोखले. हरयाणाचा रोहित गुलीयानं सर्वाधिक ८ गुण कमावले, तर कर्णधार विकास कंडोलानं ५ गुणांची कमाई केली. यू मुंबाकडून अभिषेक सिंगनं ४ गुण कमावले. तामिळ थलायव्हाजनं पहिल्या हाफमध्ये २१-१० अशी आघाडी घेऊन सामन्याचा निकाल एकतर्फी लागेल असे संकेत दिले होते. पण, यूपी योद्धाकडून दुसऱ्या सत्रात दमदार खेळ झाला. सामना संपायला काही मिनिटांचा खेळ असताना ३५-३५ अशी बरोबरी त्यांनी मिळवली होती. यूपी योद्धाच्या सुरेंदर गिलनं एकहाती संघर्ष करताना १४ गुण घेतले, पण तामिळ थलायव्हाजच्या सांघिक खेळासमोर त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. मनजीत, सुरजीत सिंग, के. प्रपंजन, भवानी राजपूत, सागर, अजिंक्य पवार यांनी अफलातून कामगिरी करताना तामिळ थलायव्हाजचा ३९-१५ असा विजय पक्का केला. या सामन्यात प्रदीप नरवालनं ६ गुणांची कमाई करून इतिहास रचला. प्रो कबड्डी लीगमध्ये १२०० गुणांचा पल्ला ओलांडणारा तो पहिला खेळाडू ठरला. प्रदीपच्या नावावर १२०१ गुण झाले आहेत. त्यानंतर राहुल चौधरी ( ९६४), दीपक हुडा ( ८८८), मनिंदर सिंग ( ८०३) व अजय ठाकूर ( ७९१) यांचा क्रमांक येतो.