Pro Kabaddi League 11: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या 11 व्या हगामासाठी झालेल्या लिलावात नवा विक्रम सेट झाला आहे. या लिलावाची सुरुवात इराणच्या मोहम्मदरेझा शादलूसह सुरु झाली. ज्याला हरियाणा स्टीलर्सनं २ कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
८ खेळाडू झाले 'करोडपती'
इराणच्या खेळाडूशिवाय अन्य काही खेळाडूंसाठीही वेगवेगळ्या संघांनी कोट्यवधींची बोली लावली. प्रो कबड्डीच्या यंदाच्या लिलावात एकूण 8 खेळाडू कोट्याधीश झाले. हा एक नवा विक्रमच आहे.
सर्वात महागडा खेळाडू कोण?
सचिन तन्वर हा प्रो कबड्डी लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय पवन कुमार सेहरावत, सुनील कुमार आणि गुमान सिंह यांनाही तगडी रक्कम मिळाल्याचे पाहायला मिळाले.
प्रो कबड्डी लीगच्या मागील दोन हंगामातील सर्वात महागडा खेळाडू राहिलेल्या पवन सेहरावत याला यावेळी आघाडीच्या ३ महागड्या खेळाडूंमध्येही स्थान मिळाले नाही. ही गोष्ट यंदाच्या हंगामाआधी लिलावात संघ मालकांनी एक वेगळी रणनितीसह डाव खेळल्याची झलक दाखवून देणारी आहे.
एक नजर लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंवर
- सचिन तन्वर - तमिळ थलायवाज संघाने भारतीय रेडर (चढाईपट्टू) साठी २.१५ कोटी रुपये मोजले. तो या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
- मोहम्मदरेझा शादलू- इराणच्या या खेळाडूसाठी हरियाणा स्टीलर्सनं २.०७ कोटी रुपये मोजले. तो यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला.
- गुमान सिंह - गुजरात जाएंट्सनं यू मुम्बाच्या माजी रेडर (चढाईपट्टू) साठी १.९७ कोटी रुपये मोजले.
- पवन सेहरावत - तेलुगु टायटन्सनं FBM कार्डचा वापर करत आपल्या माजी कॅप्टनला १.७२५ कोटी रुपयांसह पुन्हा ताफ्यात सामील करून घेतलं.
- भरत हूडा - यूपी योद्धाजच्या संघाने बंगळुरु बुल्सच्या माजी खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी १.३० कोटी रुपये खर्च केले.
- मनिंदर सिंग - बंगाल वॉरियर्सनं FBM कार्डच्या माध्यमातून या खेळाडूवर १.१५ कोटींचा डाव खेळला.
- अजिंक्य पवार- बंगळुरु बुल्सनं तमिळ थलायवाजचा माजी रेडर (चढाईपट्टू) साठी १.१०७ कोटी रुपये मोजले.
- सुनील कुमार - यू मुम्बानं जयपूर पिंक पँथर्सच्या माजी कॅप्टनला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी १.०१५ कोटी रुपये खर्च केले. सुनील आता प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा बचावट्टू ठरला आहे.