मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहव्या पर्वात भारतीय खेळाडूंना टक्कर देत यू मुंबाचा कर्णधार धुमाकूळ घालत आहे. इराणच्या फझल अत्राचलीने पकडीच्या गुणांचे द्विशतक साजरे करून मोठा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह सात खेळाडूंना पकडीचे दोनशे गुण घेता आले आहेत.
अत्राचालीला दोनशे गुणांचा पल्ला गाठण्यासाठी पाच गुणांची आवश्यकता होती आणि त्याने सहा गुण घेत हा पल्ला ओलांडला. याआधी मनजीत छिल्लर, संदीप नरवाल, मोहित छिल्लर, रविंदर पहल, सुरेंदर नाडा आणि गिरीश इर्नाक यांनी पकडीत दोनशेहून अधिक गुण कमावले आहेत.
यंदाचे सत्र अत्राचलीसाठी यशस्वी ठरत आहे. त्याने 13 सामन्यांत आत्तापर्यंत पकडीचे 52 गुण घेतले आहेत. यंदाच्या सत्रात यशस्वी बचावपटूंत तो आघाडीवर आहे.
पकडीचे सर्वाधिक गुण 279 गुण : मनजीत छिल्लर ( 84 सामने) 237 गुण : संदीप नरवाल ( 93 सामने)231 गुण : मोहित छिल्लर ( 86 सामने) 231 गुण : रविंदर पहल ( 76 सामने)222 गुण : सुरेंदर नाडा ( 71 सामने) 205 गुण : गिरीश इर्नाक ( 81 सामने )204 गुण : फजल अत्राचली ( 69 सामने)