कानपूर : भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान ग्रीन पार्कमध्ये २२ सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडियाला सराव करता आला नाही. सकाळी भारतीय संघ मैदानात पोहोचला होता, पण पावसामुळे खेळाडूंना सराव न करताच माघारी परतावे लागले. शनिवारी रात्री येथे दाखल झालेला भारतीय संघ रविवारी दुपारी १.३० पासून सराव करणार होता, पण १२.३० ला पावसाला सुरुवात झाल्यामुळे संघाला सराव रद्द करावा लागला. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) सीईओ ललित खन्ना म्हणाले, ‘रविवारी सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी मैदानावर फिटनेस केला. सराव सत्र दुपारी १ ते ४ दरम्यान होते, पण पावसामुळे भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये परतले. मैदानावर कव्हर टाकण्यात आले असून जर सोमवारी वातावरण चांगले राहील तर भारतीय संघ सराव करेल.’चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या मोसम विभागाचे प्रमुख अनिरुद्ध दुबे यांनी सांगितले की, कसोटी सामन्यापूर्वी आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे.खन्ना म्हणाले, ‘मैदानावर कव्हर टाकण्यात आले असून येथे पाणी थांबण्याची शक्यता नाही.’ दरम्यान, रविवारी सकाळच्या सत्रात भारतीय संघाचे खेळाडू फिटनेस करीत असताना एक कुत्रा मैदानात शिरला. त्याला बाहेर काढण्यासाठी मैदानावरील कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. (वृत्तसंस्था)
पहिल्या कसोटीदरम्यान पावसाची शक्यता
By admin | Published: September 19, 2016 3:54 AM