मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तांत्रिक समितीने पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.बीसीसीआय तांत्रिक समितीची मंगळवारी येथे बैठक झाली असून त्यात स्थानिक क्रिकेटमध्ये काही बदल करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशी बोर्डाच्या कार्यकारिणीपुढे ठेवण्यात येतील. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये आयोजित टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत होणारी दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्यात यावी, असा प्रस्ताव या समितीने दिला आहे. बैठकीमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत सध्या असलेल्या गुणप्रणालीवर चर्चा झाली. सहभागी संघांना थेट विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, यावर या बैठकीत भर देण्यात आला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर संघाला ३ गुण व प्रतिस्पर्धी संघाला एक गुण अशी असलेली सध्याची प्रणाली संपविणे आवश्यक आहे. त्याऐवजी फलंदाजी व गोलंदाजीसाठी बोनस गुण मिळायला हवा आणि त्यासाठी केवळ पहिल्या डावातील कामगिरी विचारात घ्यायला हवी, अशी शिफारस करण्यात आली. नव्या प्रस्तावानुसार जो संघ ८५ षटकांत ३०० धावा करतो किंवा जो संघ ८५ षटकांत ७ बळी घेतो त्या संघांना एक-एक बोनस गुण मिळावा. निर्णायक विजयासाठी सहा गुण व एक बोनस गुणाची सुरुवातीची पद्धत कायम असावी. तांत्रिक समितीचे अध्यक्ष व भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देवधर ट्रॉफी स्पर्धेत सध्या अस्तित्वात असलेल्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार आता या स्पर्धेत तीन संघ सहभागी होतील. त्यात विजय हजारे करंडक विजेता संघ व राष्ट्रीय निवड समितीतर्फे निवडण्यात आलेले दोन संघ यांचा समावेश राहील. वन-डे आंतरराज्य सीनिअर स्पर्धा व सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या स्वरुपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय पद्धतीपेक्षा देशपातळीवर ४ गट तयार करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली.साशंक गोलंदाजी शैली रोखण्यासाठी बीसीसीआयतर्फे होत असलेल्या प्रयत्नांची समितीने प्रशंसा केली. समितीने यासाठी आयसीसीचे नियम लागू करण्याची शिफारस केली. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल. दरम्यान, समितीने काही स्थळांवरील खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि यामध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय सुचविले. बैठकीनंतर बोलताना कुंबळे म्हणाले, ‘या बैठकीमध्ये स्थानिक क्रिकेट अधिक मजबूत करण्यावर जोर देण्यात आला. गेल्या तीन बैठकीनंतर या शिफारशी देण्यात आल्या. त्यात कर्णधार व प्रशिक्षकांची आणि तांत्रिक समितीच्या बैठकींचा समावेश आहे. या शिफारशींमुळे स्थानिक क्रिकेटमध्ये चुरस व संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळेल, अशी आशा आहे.’ बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘सर्व संलग्न असोसिएशनकडून सूचना मिळाल्यानंतर यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. यातील काही शिफारसींचा दीर्घकालीन प्रभाव दिसेल आणि आगामी सत्रामध्ये आवश्यक गरजा पूर्ण करण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)
दुलिप ट्रॉफी स्थगित करण्याचा प्रस्ताव
By admin | Published: May 20, 2015 1:33 AM