लंडन : सर्व प्रकारच्या टी-२० सामन्यांसाठी डीआरएसचा वापर तसेच अभद्र व्यवहार करणाऱ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा अधिकार मैदानी पंचांना बहाल करण्याची शिफारस टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने केली आहे. वार्षिक आमसभेत ज्या अनेक शिफारशी करण्यात आल्या. त्यात या दोन शिफारशी प्रमुख आहेत.पायचीतच्या निर्णयाची पंच समीक्षा करतील तेव्हा संघाच्या वाट्याला आलेले रिव्ह्यू कमी होऊ नये, अशी आणखी एक शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस अमलात आल्यास कसोटी क्रिकेटमधील ८० षटकांनंतरचा ‘टॉप अप रिव्ह्यू’ काढून घेण्यात येणार आहे. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्यासाठी ही कृती आवश्यक असल्याने समितीने सर्वसंमतीने मागणीला पाठिंबा दिला. आॅलिम्पिकमध्येही क्रिकेटच्या समावेशाला पाठिंबा मिळाला आहे. समितीने क्रिकेटच्या २०१७ च्या नव्या नियमांवरदेखील विचार केला. यात काही सुधारणादेखील सुचविल्या असून, एखाद्या खेळाडूची मैदानातील वागणूक खेळाच्या हिताला बाधक असल्यास त्याला मैदानाबाहेर घालविण्याचा अधिकार मैदानी पंचांना बहाल करण्यात यावा, ही प्रमुख सुधारणा आहे.
टी-२० साठी डीआरएसचा प्रस्ताव
By admin | Published: May 26, 2017 3:27 AM