जगातील मानाची समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा नुकतीच पार पडली. प्रेमाचं शहर अशी ओळख असलेल्या फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पडलेल्या स्पर्धेत भारतासह वेगवेगळ्या देशातील खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरीसह खेळाच्या मैदानात नवे विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय आणखी एका गोष्टीचा खास विक्रम नोंदवला गेला आहे. तो विक्रम आहे प्रेमाचा.
या मानाच्या स्पर्धेत मेडल्स जिंकून अभिमानास्पद कामगिरी केल्यानंतर काही खेळाडूंच्या आयुष्यात रंगलेल्या प्रेमाचा खेळाला एक नवा बहर आल्याचा सीन देखील सध्या चर्चेत आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या ११ खेळाडूंनी आपल्या जोडीदाराला लग्नासाठी थेट प्रपोज केले. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं खेळाडूंनी आपलं प्रेम जगजाहीर केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा एक रेकॉर्डच आहे.
पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष टोनी एस्टांगुएट यांनी ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यातही खेळाडूंच्या प्रेमाच्या खेळाची खास गोष्ट बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते की, ''पॅरिस 2024 मध्ये अनेक रेकॉर्ड मोडित निघाले. विक्रमी प्रेक्षक, डेसिबलचा रेकॉर्ड आणि खेळाडूंच्या सहभागाशिवाय आणखी एक खास रेकॉर्ड प्रस्थापित झाला. तो म्हणजे प्रेमाचा. यंदा ऑलिम्पिक गेम्समध्ये खेळाडूंमधील सर्वाधिक मॅरेज प्रपोजलचा आकडा पाहायला मिळाला." एक नजर टाकुयात 'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमध्ये रंगलेल्या प्रेमाच्या खेळातील खेळाडूंसदर्भातील गोष्टीवर
बॅडमिंटमधील जोडी
चीन बॅडमिंट स्टार हुआंग याकिओंग हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. या ऐतिहासिक विजयानंतर तिचा बॉयफ्रेंड लियू युचेन याने तिला लग्नासाठी मागणी घातल्याचा सीन पाहायला मिळाला. जे घडलं ते तिच्यासाठी मोठ सरप्राइज होते. सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद आणि त्यात बॉयफ्रेंडने अंगठी देत केलेले प्रपोज हा क्षण तिच्यासाठी आनंद गगनात मावेना, हा सीन दाखवून देणारा होता. युचेन हा देखील बॅडमिंटन खेळाडूच आहे.
ती धावत धावत स्टँडमध्ये बसलेल्या बॉयफ्रेंडपर्यंत पोहचली
फ्रान्सची धावपटू एलिस फिनोट ही महिला गटातील ३००० मीटर स्टीपलचेज शर्यतीत यूरोपीय रेकॉर्ड तोडण्याशिवाय मॅरेज प्रपोजलमुळेही चर्चेत राहिली. लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर फिनोट स्टँडरजे धावत गेली. तिने गुडघ्यावर बसून आपल्या बॉयफ्रेंडला प्रपोज केले.
रग्बीच्या मैदानातील खेळाडूंमधील प्रेम
अमेरिकन महिला रग्बी सेवन्स खेळाडू एलेव केल्टर हिनं कांस्य पदक जिंकल्यानंतर सहकारी रग्बी खेळाडू कॅथरीन ट्रेडरला प्रपोज केल्याचे दिसून आले.
एलेसिया
इटलीची जिमनॅस्टिक एलेसिया मौरेली हिला तिचा जोडीदार मॅसिमो बर्टेलोनी याने प्रेमाच्या शहरात लग्नासाठी मागणी घातली. मोरेलीनं ग्रुप ऑल-अराउंड इवेंटमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. ही जोडी जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होती.
आयफेल टॉवर, ती अन् तो
अमेरिकेच्या जस्टिन बेस्ट याने आयफेल टॉवरसमोर आपली गर्लफ्रेंड लॅनी डंकनला प्रपोज केले. जस्टिन याने रोइंगमध्ये गोल्डन कामगिरी करून दाखवली आहे.
याशिवाय अमेरिकन गोळाफेकपटू पॅटन ओटरडाहल याने गर्लफ्रेंड मॅडी नील्स हिला आयफेल टॉवरच्या बॅकराऊंडमध्ये प्रोपज केल्याचे दिसून आले.