मुंबई : कुस्ती खेळाचा करिअर म्हणून निवड केल्यानंतर समाजात विविध अडचणींचा सामना करावा लागला. प्रसंगी टोमणेही ऐकावे लागले, मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मी स्वत:ला सिद्ध केले’’, असे मत आॅलिंपिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिकने व्यक्त केले. मुंबईत पार झालेल्या महिलांच्या सामाजिक कार्यक्रमात साक्षी बोलत होती.नुकत्याच पार पडलेल्या रिओ पॅरालिंपिक स्पर्धेबाबत साक्षी म्हणाली, ‘‘रिओ पॅरालिम्पिक पदक विजेती दिपा मलिकची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या असून मी त्यांच्या कामगिरीने प्रभावित झाली. त्यांच्यासह झालेल्या भेटीनंतरभविष्यातील कामगिरीसाठी मला प्रेरणा मिळाली. मुळात देशाचे प्रतिनिधित्व करणे नेहमीच अभिमानास्पद आहे. त्यामुळे आॅलिंपिक असो वा पॅराआॅलिंपिक दोन्ही समान आहे. त्यात भेदभाव करणे चुकीचे आहे.’’‘‘सराव करताना नेहमी आॅलिंपिक पदकाचे लक्ष्य ठेवूनच सराव करत होती. त्यामुळे पदक जिंकण्याचा विश्वास होता. पदक जिंकल्यानंतर इतका सन्मान मिळेल, इतकी प्रसिद्धी मिळेल याची कल्पनाही नव्हती,’’ असेही साक्षीने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी) >प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कारकीर्द करावी. लोक काय बोलतील, याचा कधीही विचार करु नका. केवळ मेहनत, जिद्द आणि स्वत:वरचा ठाम विश्वास कायम ठेवा. यश तुम्हाला नक्की मिळेल. - साक्षी मलिक
अडचणींतूनच स्वत:ला सिद्ध केले
By admin | Published: September 21, 2016 4:15 AM