मुंबई : भारत-आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या ‘बिग थ्रीं’चे क्रिकेटमधील वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील आर्थिक सुधारणांची आम्हाला माहिती द्या, या शब्दात बीसीसीआय कार्यकारिणीने शशांक मनोहर यांना धारेवर धरले आहे. आयसीसीची फेररचना करताना काय उपाय शोधण्यात आले अशी विचारणा या सदस्यांनी केली. जुन्या यंत्रणेनुसार इंग्लंड व आॅस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासोबत बीसीसीआयला एकूण नफ्यापैकी ८० टक्के वाटा मिळतो. हे तिन्ही देश अधिक पैसा कमवून देतात, अशी तिन्ही देशांची भावना आहे. मनोहर मात्र आर्थिक उत्पन्नाचे समान वितरण व्हावे या मताचे आहेत. यामुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात घट होणार आहेच शिवाय मनोहर यांनी आयसीसी बैठकीला दुबईला रवाना होण्याआधी बीसीसीआयच्या कुठल्याही बैठकीत हा मुद्दा सांगितला नव्हता याबद्दल अनेक सदस्य नाराज आहेत. कार्यसमितीने आज अध्यक्ष व सचिवांनी आर्थिक मुद्यांवर निर्णय घेण्याआधी आम्हाला विश्वासात घ्यायला हवे अशी भावना व्यक्त केली. नंतर सदस्य शांत झाले. त्यांनी अध्यक्ष व सचिवांना आयसीसी संचालनात आर्थिक पुनर्गठनावर चर्चा करण्याचे सर्वाधिकार प्रदान केले. यासंदर्भात बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उदार बनण्यात आम्हाला अडचण नाही. पण अशा कुठल्याही निर्णायाची माहिती सदस्यांना मिळायला हवी. बीसीसीआयने आर्थिक नफ्यासोबत समझोता केला. यामुळे राज्य संघटनांची आर्थिक स्थिती काय होईल, याचा अंदाज त्यांना नसावा. सामन्यांचे वितरण समान व्हावे याकडेही लक्ष देण्यास अध्यक्ष व सचिवांना सांगितल्याचे हा अधिकारी म्हणाला.(वृत्तसंस्था)
आर्थिक सुधारणांची माहिती द्या
By admin | Published: February 20, 2016 2:37 AM