-अयाझ मेमन संपादकीय सल्लागारचॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेत ‘रेन डे’ची तरतूद असायला नको का? ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असेल, तर अशी तरतूद असावीच. ज्या आॅस्ट्रेलियाचे दोन सामने पावसात धुतले गेले; तो संघ तर या मताशी सहमत असेलच. आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला स्टीव्ह स्मिथचा संघ केवळ दोन गुणांवर असून स्पर्धेबाहेर होण्याचे संकट डोक्यावर घोंघावत आहे. अ गटात आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांसोबत बांगलादेशची स्थिती वेगळी नाही. हा संघ एकसामना हरला आणि दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियासोबत त्यांची गुणविभागणी झाली, उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांनादेखील भाग्याचीच साथ हवी असेल. पावसासारखी अनपेक्षित घटना खेळाचा एक भाग आहे. अशा अनपेक्षित घटना नसतील, तर खेळ कमकुवत होईल. खेळपट्टी आणि हवामान यामुळे क्रिकेट प्रभावित होत असले, तरी हा खेळाचा अविभाज्य भाग बनला आहे.हवामान अनिश्चित स्वरूपाचे असेल त्या देशात ‘रेन फॅक्टर’ प्रभावी ठरतो. इंग्लंड याचे मुख्य उदाहरण ठरावे. याचा अर्थ असा नव्हे की, एकच देश वारंवार प्रभावित होतो. श्रीलंका, कॅरेबियन देश आणि न्यूझीलंड येथील हवामान अनिश्चित स्वरूपाचे आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, द. आफ्रिका, झिम्बाब्वे आणि आॅस्ट्रेलिया हे देशदेखील क्रिकेट मोसमात वाईट हवामानाचे बळी ठरतात. या देशात मात्र पाऊस कधी येईल, याची शाश्वती नसते. उदा. भारत, आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेसारख्या मोठ्या देशांत वेगवेगळ्या प्रांतात हवामानाची स्थिती बदलणारी असते. या दृष्टीने हवामानातील अनियमितपणा हा क्रिकेटचा एक भाग होऊन बसला. क्रिकेट विकसित झाल्याने माझ्या मते चाहते, आयोजक आणि खेळाडूंच्या मागणीनुसार परिस्थिती अनुकूल असावी. चाहत्यांना वाटू नये की, त्यांच्यासोबत विश्वासघात होत आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात निकालाची प्रत्येकाला अपेक्षा असते. अनेकदा कसोटी सामने अनिर्णीत राहत असल्याने चाहते आणि प्रायोजक दूर जात होते. याच पार्श्वभूमीवर वन डे आणि टी-२० सारख्या प्रकाराचा उदय झाला, हे वास्तव आहे. विशेष असे की, १९८३ च्या प्रुडेन्शियल विश्वचषकादरम्यानदेखील साखळी सामन्यादरम्यान ‘रेन डे’ची तरतूद करण्यात आली होती. ओल्ड ट्रॅफोर्डवर भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला नमविले, तो सामना पावसामुळेच दुसऱ्या दिवसापर्यंत लांबला होता. काही प्रकरणी पावसाचा फटका बसलेला संपूर्ण सामना दुसऱ्या दिवशी खेळविण्यात येत होता. ‘रेन डे’ची पद्धत त्या वेळी सर्वच स्पर्धा विशेषत: आयसीसीद्वारा आयोजित वन डे स्पर्धांमध्ये सातत्याने का अवलंबण्यात आली नाही; याचे मला आश्चर्य वाटते. सामना पावसात वाहून गेल्याने खेळाडू, चाहते आणि प्रायोजक असमाधानी राहतात. पावसामुळे सामना खंडित होण्याऐवजी तो संपूर्ण षटकांचा व्हावा, यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न का होताना दिसत नाही. स्पर्धेची योजना आखताना काही टप्पे काळजीपूर्वक विचारात घेण्यात यावेत. पण पावसामुळे पुढील दिवशीचा सामना संकटात येणार नाही, याची शंभर टक्के खात्री कुणालाही देता येणार नाही. तथापि, सामना पूर्ण होण्यासाठी तसेच न्यायपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी तरी किमान ‘रेन डे’ची तरतूद असायलाच हवी. २१व्या शतकातील क्रिकेट १९व्या शतकासारखे वागू शकत नाही.
‘रेन डे’ची तरतूद असायलाच हवी
By admin | Published: June 08, 2017 4:12 AM