O. M. Nambiar: भारतीय महिला धावपटू पीटी उषा यांना घडविणारे प्रशिक्षक ओएम नांबियार (OM Nambiar) यांचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यासोबतच १९८४ साली लॉस अँजलिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये पीटी उषाच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ओएम नांबियार यांना १९८५ साली द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.
पीटी उषा यांच्यासोबतच नांबियार यांनी शायनी विल्सनलाही प्रशिक्षण दिलं आहे. शायनी विल्सननं चार ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. १९८५ सालच्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत ८०० मीटर रेसमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. याशिवाय देशाची दिग्गज धावपटू राहिलेल्या वंदना रावलाही नांबियार यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. नांबियार यांनी १९६८ साली एनआयएस पटियालामधून प्रशिक्षण विभागात डिप्लोमा केला आणि १९७१ सालापासून केरळ क्रीडा परिषदेशी संलग्न झाले.
पीटी उषाला ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचं होतं स्वप्नभारताची धावपटू पीटी उषाला ऑलिम्पिक पदक जिंकून देणं हे ओएम नांबियार यांचं सर्वात मोठं स्वप्नं होतं. १९८४ साली लॉस अँजलिस ऑलिम्पिकमध्ये थोडाशा अंतरानं पीटी उषाचं कांस्य पदक हुकलं होतं. "जेव्हा मला कळालं की १९८४ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटरमध्ये उषाचं केवळ एका सेकंदाच्या शंभराव्या हिस्स्याच्या फरकानं कांस्य पदक हुकलं तेव्हा मी खूप रडलो होतो. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. उषानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं हेच माझ्या जीवनातील सर्वात मोठं स्वप्नं होतं", असं ओएम नांबियार एका मुलाखतीत म्हणाले होते.