नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी मायदेशातील क्रिकेट मोसमाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी चेतेश्वर पुजाराच योग्य असल्याचे म्हटले आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेत काही सामन्यांसाठी त्याला बाहेर ठेवण्यात आले, हा रणनीतीचा भाग असल्याचे कुंबळे यांनी यावेळी स्पष्ट केले. कुंबळे म्हणाले, ‘सध्याच्या क्रिकेटमध्ये सर्वचजण खेळाडूमध्ये काय विशेष आहे हे बघण्यापेक्षा त्याच्या स्ट्राईक रेटवर अधिक लक्ष देतात. पुजारा आमच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करीत असल्यामुळे तो स्पेशल खेळाडू ठरतो. त्याच्या जागी रोहित शर्माचा समावेश करण्यात आल्याचे प्रसंगही घडले आहेत. तळाच्या स्थानावर वेगाने धावा फटकावणाऱ्या फलंदाजाची गरज असल्याचे संघाला वाटत असते त्यावेळी असा निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे विंडीज दौऱ्यात काही सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.’कोहलीच्या पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीबाबत बोलताना कुंबळे म्हणाले, ‘प्रत्येकवेळी पाच गोलंदाजांसह खेळण्याचा विचार करणे आवश्यक नाही. प्रतिस्पर्धी संघ, खेळपट्टी आणि संघाची गरज यावर ते अवलंबून असते. जर ४ गोलंदाज २० बळी घेण्यास सक्षम असतील तर आम्ही संघात अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्याचा विचार करतो. सामन्यात विजय मिळविणे महत्त्वाचे असते.’यष्टिरक्षक रिद्धिमान साहापेक्षा रविचंद्रन अश्विनला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याबाबत बोलताना कुंबळे म्हणाले, ‘सहा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्यावर दडपण असल्याचे आम्हाला जाणवले. हे स्थान त्याच्यासाठी योग्य नसल्याचे निदर्शनास आले. अश्विनसारखा फलंदाज दडपण झुगारण्यास सक्षम असल्यामुळे साहाला नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी मिळते. अश्विनने आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याने दोन शतके झळकावली असून, सहाव्या क्रमांकावर उपयुक्तता सिद्ध केली आहे.’ (वृत्तसंस्था)
तिसऱ्या क्रमांकावर ‘पुजारा’च योग्य : कुंबळे
By admin | Published: September 12, 2016 12:44 AM