कोलकाता : टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारावर वेस्ट इंडिज दौऱ्यातील संथ फलंदाजीमुळे टीका होत असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मात्र पुजाराचे समर्थन केले असून, संघाच्या योजनांमध्ये पुजारा महत्त्वपूर्ण खेळाडू असून, त्याच्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही, असे सांगितले.विंडीज दौऱ्यानंतर पुजाराच्या स्ट्राइक रेटमध्ये चांगलीच सुधारणा झाली. विंडीज दौऱ्यावर त्याने दोन्ही डावांमध्ये ६२ धावा काढल्या. कानपूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध पुजाराने अनुक्रमे ६२ व ७८ धावांची खेळी खेळली. त्याने मुरली विजयसह केलेल्या दोन शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरल्या.माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी वक्तव्य केले होते की, विंडीज दौऱ्यात पुजराचा फॉर्म चिंतेचा विषय होता आणि कुंबळे व कर्णधार कोहली यांनी पुजाराशी स्ट्राइक रेट उंचावण्याविषयी बातचीत केली होती. याबाबत कुंबळे म्हणाले की, ‘मी खूप आश्चर्यचकीत आणि निराश आहे की, याप्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. जेव्हा कोणी खेळाडू परिस्थितीनुसार चांगला खेळतो, तोपर्यंत सर्वकाही सुरळीत असते. ते आमच्या योजनांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मला माहितेय त्याचे यश कायम राहील.’गौतम गंभीरच्या पुनरागमनाविषयी कुंबळे म्हणाले की, ‘गौतमचे पुनरागमन खूप चांगले आहे. दुर्दैवाने लोकेश राहुल गतसामन्यात दुखापतग्रस्त झाला. मला वाटते की, सलामीवीर फलंदाजांसह काहीतरी घडत आहे. कोणत्या तरी कारणामुळे ते दुखापतग्रस्त होत आहे. विंडीज दौऱ्यात विजयला दुखापत झाली, तर आता राहुलला. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता.’गंभीरने देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केले. तो १५ सदस्यीय संघाचा भाग आहे. सर्व १५ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत, असेही कुंबळे यांनी या वेळी सांगितले. तसेच, या वेळी कुंबळे यांनी रोहित शर्माचेही समर्थन केले. (वृत्तसंस्था)लेगस्पिनर अमित मिश्राचा कसून सरावभारताने कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यांत ४ गोलंदाजांसह विजय मिळविला असला, तरी दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र अमित मिश्राला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण हा लेग स्पिनर बुधवारी फलंदाजी व गोलंदाजीचा कसून सराव करीत असल्याचे दिसून आले. भारतीय प्रशिक्षक व महान लेग स्पिनर अनिल कुंबळे यांनी ५ गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीचे समर्थन केले आहे. कुंबळे यांनी आज माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत प्रदीर्घ काळ चर्चा केली. गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. दोघांनी खेळपट्टीचे निरीक्षण केले आणि क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्यासोबत चर्चाही केली. दरम्यान, मिश्राने आजच्या ऐच्छिक सराव सत्रादरम्यान कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांना गोलंदाजी केली. मी थोडा जुन्या विचारांचा आहे. जोपर्यंत माझा प्रश्न आहे, तर जेव्हा मी खेळत होतो, तेव्हा ज्या टेस्ट क्रिकेट स्ट्राइक रेटची चर्चा व्हायची ती गोलंदाजांची असायची. संघामध्ये विविध लोकांची, विविध स्तराच्या खेळाडूंची, तसेच विविध कौशल्यांच्या खेळाडूंची गरज असते. कसोटी क्रिकेटचे प्रत्येक सत्र वेगळे असल्याने यासर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. हीच कसोटी क्रिकेटची आकर्षक बाब आहे. माझ्या दृष्टिकोनातून कसोटी क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट केवळ गोलंदाजांसाठी महत्त्वाचा असतो, फलंदाजांसाठी नाही.- अनिल कुंबळे, भारतीय प्रशिक्षक
संघाच्या योजनांमध्ये पुजारा महत्त्वपूर्ण
By admin | Published: September 29, 2016 4:28 AM