ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. २ - भारताला श्रीलंकेत तब्बल २२ वर्षांनी कसोटी मालिका जिंकून देण्यात सिंहाचा वाटा असलेले चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा या दोघांचाही आयसीसीच्या कसोटी रँकिंगमधील पहिल्या २० खेळाडूंमध्य समावेश झाला आहे. चेतेश्वर पुजारा अव्वल फलंदाजांमध्ये २० स्थानावर तर कसोटीत २०० बळी टिपणारा इशांत शर्मा गोलंदाजांमध्ये १८ व्या स्थानावर आहे.
मंगळवारी (१ सप्टेंबर) भारताने श्रीलंकेविरोधातील तिसरी कसोटी जिंकून मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आणि भारताने तब्बल २२ वर्षांनी श्रीलंकेवर त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत विजय नोंदवला. या तिस-या कसोटीत चेतेश्वर पुजाराने जोरदार फलंदाजी करत नाबाद १४५ धावांची खेळी केली असून त्याला प्रथमच आयसीसीच्या अव्वल २० फलंदाजांमध्ये समावेश मिळाला आहे. तर कर्णधार विराट कोहली ११व्या स्थानावर आहे. दरम्यान या कसोटीत तब्बल ८ बळी टिपून २०० कसोटी बळींचा विक्रम नोंदवणारा इशांत शर्मा अव्वल फलंदाजांमध्ये १८ व्या स्थानावर आहे. तर या कसोटी मालिकेत तब्बल २१ बळी टिपून 'मॅन ऑफ दि सीरिज' ठरलेला आर. अश्विन या रॅंकिंगमध्ये ८व्या स्थानावर आहे.