नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या रवींद्र जडेजा, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळाले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या आपल्या वार्षिक करारनाम्यामध्ये या दोन्ही खेळाडूंचा ‘अ’ श्रेणीमध्ये समावेश केला आहे. तसेच, एकूण ३२ खेळाडूंचे वार्षिक मानधन दुप्पट केले आहे. या ‘अ’ श्रेणी गटात कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचाही समावेश असून त्यांचे वार्षिक मानधन दोन करोड रुपये असेल. बीसीसीआय प्रशासक समितीने (सीओए) बुधवारी ‘अ’ श्रेणी खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. या खेळाडूंना यंदाच्या मोसमापासून वार्षिक दोन करोड रुपये मिळतील. याआधी या श्रेणीतील खेळाडूंना एक करोड रुपये मिळायचे. तसेच, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणी गटातील खेळाडूंना अनुक्रमे एक करोड आणि ५० लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे कसोटी सामन्याचे मानधनही वाढवण्यात आले असून, आता खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील. याआधी हीच रक्कम ७.५० लाखइतकी होती. त्याचप्रमाणे, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी खेळाडूंना अनुक्रमे ६ आणि ३ लाख रुपये मिळतील. १ आॅक्टोबर २०१६ पासून खेळलेल्या खेळाडूंना हे मानधन लागू होणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले.अव्वल ‘अ’ गटामध्ये कोहली आणि धोनीसह चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन आणि मुरली विजय यांचा समावेश आहे. तसेच, अनुभवी खेळाडू युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांना अनुक्रमे ब आणि क श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. तसेच, यामध्ये सुरेश रैनाला स्थान मिळालेले नाही. (वृत्तसंस्था)
पुजारा, जडेजा यांची ‘अ’ श्रेणीत बढती
By admin | Published: March 23, 2017 12:24 AM