ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २९ - श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या व अखेरच्या कसोटीत चेतेश्वर पुजाराने संयमी खेळ करत शानदार शतक झळकावल्याने भारताने ९३ षटकांत ८ गडी गमावून २८६ धावा केल्या आहेत. भारताचे महत्वाचे फलंदाज पटापट तंबूत परत जात असताना पुजाराने मात्र अत्यंत शांतपणे व धीरोदत्तपणे खेळू महत्वाची शतकी खेळी केली. कसोटीतील हे त्याचे सातवे शतक आहे.
दुस-या दिवसाचा खेळ सुरू करताना भारताची स्थिती २ बाद ७२ अशी होती मात्र कर्णधार विराट कोहली (१८), रोहित शर्मा (२६) स्टुअर्ट बिन्नी (0), नमन ओझा (२१) व अश्विन (५) हे पटापट बाद झाल्याने भारताचा डाव गडगडला. मात्र पुजाराने चांगली खेळी करून भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसादने ४ तर मॅथ्यूज, हेराथ, कौशल व प्रदीपने प्रत्येकी १ बळी टिपला.
पुजाराला अमित मिश्राने आठव्या विकेटसाठी मोलाटी साथ दिली. मिश्राने नवव्या क्रमांकाच्या फलंदाजाचा कोलंबोतील मैदानावरचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडताना ८७ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या. तर पुजारा १२९ धावांवर खेळत असून ईशांत शर्मा जोडीला आला आहे. पुजारा व मिश्राने नवव्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागिदारी केली आणि भारताला ३०० धावांच्या लक्ष्याच्या समीप आणले.
अर्धशतकी व अत्यंत उपयुक्त खेळी खेळणारा मिश्रा दुर्देवाने बाद झाला. रंगना हेराथच्या गोलंदाजीवर त्याने पुढे जात मारलेला चेंडू त्याच्या पायाला लागून यष्टिरक्षकाकडे गेला व त्याने लागलीच त्याला यष्टिचीत केले.