टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीदरम्यान भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. त्यांच्यात आत्मविश्वासासह उत्कंठा देखील पहायला मिळते. कोरोनाच्या सावटातही त्यांची तयारी थांबलेली नाही. असंख्य आव्हाने पेलण्यास आमचे खेळाडू सज्ज आहेत. वर्षभर खेळ लांबणीवर पडले पण आमच्या खेळाडूंचा उत्साह मुळीच कमी झालेला नाही. त्यांनी उत्कृष्ट शारीरिक, भावनिक आणि प्रतिस्पर्धी तयारीत कुठलीही कसर शिल्लक राखली नाही.
ज्या बॅडमिंटनपटूंना पात्रता गाठण्यात यश आले त्यांना आवश्यक पाठिंबा देखील लाभला आहे. प्रत्येकाला परदेशी प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले. सोबतीला फिजियो आणि कंडिशनिंग कोच आहेच. आधी या गोष्टींवर लक्ष नसायचे. त्यामुळे पराभवानंतर खेळाडूंची निराशा बाहेर यायची. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये देशाला अपेक्षित निकाल मिळाला नव्हता. पंतप्रधानांनी नेमलेल्या टार्स्क फोर्समध्ये माझीही नेमणूक झाली. तेव्हापासून पायाभूत सुविधांसह देशभरात सर्वदूर टॅलेंटचा शोध घेण्यात आला. त्यामुळे सकारात्मक आणि दिलासादायी चित्र निर्माण झाले. खेळात व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. देशाने ‘ॲथ्लिट फर्स्ट’या उल्लेखनीय बदलाचा स्वीकार केला. साईच्या माध्यमातून त्यांच्यासाठी सुविधांचा दर्जा वाढवला.
उल्लेखनीय बदल म्हणून, भारताने प्रथम अॅथ्लिट्सची नेमणूक केली आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांच्या गरजा भागविल्या पाहिजेत. खेळाडूंच्या गरजा तातडीने पूर्ण करण्यात आल्या. खेळाडूंना आर्थिक साहाय्य गरजेनुसार पुरविण्यात आले.राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सहकार्याने काम करताना क्रीडा मंत्रालयाने प्रशिक्षकांच्या करारास मुदतवाढ दिली. देशात उत्कृष्टता केंद्रात राष्ट्रीय शिबिरांचे वारंवार आयोजन होऊ लागले.
टोकियो २०२० त या प्रयत्नांना फळ येईल अशी मी आशा बाळगतो.आम्ही आमच्या खेळाडूंवर लक्षणीय गुंतवणूक केल्यामुळे भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरू शकेल. यातून एक सकारात्मक लाभ होईल. खेळात करिअर करण्यास युवा खेळाडू पुढे येतील. भारताला खेळात उच्च स्थान निर्माण करता येईल. कोरोनामुळे पसरलेले निराशेचे वातावरण भारतीय खेळाडू स्वत:च्या कामगिरीमुळे दूर करतील. टोकियोतील पदक विजेती कामगिरी देशवासीयांसाठी आनंददायी ठरू शकेल.
(पुलेला गोपीचंद हे भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.)