नवी दिल्ली - पुण्यातील 19 वर्षाची तरुणी 130 दिवसांमध्ये सायकलवरुन जगभ्रमंती करणार आहे. हा तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास आहे. मूळची पुण्याची असणाऱ्या या 19 वर्षीय मुलीचे नाव वेदांगी कुलकर्णी असे आहे. जगभरातील प्रत्येक देशांमध्ये सायकलवरुन प्रवास करुन ती नवा विक्रम आपल्या नावे करण्याच्या तयारीत आहे.
वेदांगी कुलकर्णी इंग्लंडमध्ये बॉर्नमाऊथ युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स विभागात दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. वेदांगी आपल्या जगभ्रमंतीला ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या शहरापासून सुरुवात करणार आहे. वेदांगीला सायकलवरुन स्वार होत संपूर्ण जगाला सर्वात वेगवान फेरी मारुन नवा विक्रम आपल्या नावे करायचा आहे. यासाठी तिनं आपली तयारीही सुरु केली आहे. ती रोज 320 किमी सायकल चालवण्याचा सराव करत आहे. विशेष म्हणजे जगभ्रमंतीसाठी वेदांगीनं कोणत्याही संघटनेचा पाठिंबा घेतला नाही.
'मिरर'च्या वृत्तानुसार, वेदांगी ऑस्ट्रेलियावरुन यूएसच्या अलस्कावरुन न्यूझीलंडला जाणार आहे. त्यानंतर कॅनडा, पोर्तुगल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेनमार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, मंगोलिया आणि चीनला जाणार आहे. वेदांगीनं सांगितलं की, या प्रवासापासून ती #StepUpAndRideOn हा अभियान सुरू करणार आहे. महिला जगात न घाबराता काहीही करु शकतात. त्यांना घाबरण्याचे कारण नाही हे अभियान सुरु करण्यामागील उद्देश आहे. 29 हजार किमीचा हा प्रवास ती कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहे. भविष्यात लिव्हिंग एडव्हेंचर, शेअरिंग दी एडव्हेंचर या नावानं ती लघुपट करणार आहे.
वयाच्या 17 व्या वर्षी वेदांगीने सायकल चालवण्यास सुरुवात केली. तिचे वडील या जगभ्रमंतीचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी सांगितले की या यात्रेदरम्यान, वेलिंगटन (न्यूझीलंड) आणि स्पेन येथून प्रवास करणं सर्वात कठीण आहे. हे दोन जागा व्यवस्थित पार केल्यास दोन ग्रह पार केल्यासारखं आहे. जुलै 2016 मध्ये वेदांगी कुलकर्णीनं भारतातील सर्वात कठिण असलेला रस्ता यशस्वीरित्या पार केला होता. तिनं मनालीतील अतिशय धोकादायक अशा मार्गानं सायकल चालवली होती. 29 हजार किमी प्रवासांमध्ये अडचण येऊ नये म्हणून ती रोज सहा ते आठ तास सलग सायकल चालवण्याचा सराव करत आहे. ट्रायल म्हणून तिनं 14 हजार किमी सायकल चालवली आहे.