- रवि शास्त्री लिहितात...आयपीएलमध्ये यंदा आता कुठे संघांचा खेळ बहरायला लागला. पुणे आणि गुजरात संघ मात्र कुठल्यातरी गर्तेत पडल्यासारखे वाटतात. या दोन्ही संघांत एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत, पण गोलंदाजी कमकुवत आहे. पंजाबला देखील या समस्येचा सामना करावा लागू शकतो, अशी शंका येते. बेंगळुरु संघ याच समस्येने ग्रस्त होता. पण त्यांनी यावर तोडगा काढला. डिव्हिलियर्स आणि कोहली परतल्यामुळे आक्रमकतेचा संचार झाला.अन्य संघांमध्ये मुंबई आणि केकेआर स्पर्धेत चांगली पकड निर्माण करताना दिसतात. मुंबईकडे तीन युवा खेळाडू आहेत. हे सर्वजण सलग चांगली कामगिरी करीत असून युवा ब्रिगेडने अनेक गोलंदाजांचा समाचार घेतला. पांड्याबंधूंशिवाय नीतिश राणा प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. डिंडा आणि बोल्ट यांना या युवा फलंदाजांनी सर्वाधिक दणका दिला.दिल्ली डेअरडेव्हिल्स हा संघ देखील युवा खेळाडूंमुळे वरचढ ठरू शकतो किंवा तळाला जाऊ शकतो. दिल्लीची फलंदाजी पूर्णपणे युवा खेळाडूंच्या कामगिरीवर विसंबून आहे. संजू सॅमसनने तर योगदान दिले पण अन्य फलंदाज अद्याप ‘क्लिक’ झालेले नाहीत. या संघाच्या गोलंदाजांना बचाव करता याव्यात इतक्या धावा फलंदाजांनी काढायलाच हव्यात. ब्रेथवेट, अॅण्डरसन, मॉरिस हे धावा काढू शकतात.सनरायजर्स हैदराबाद पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीसाठी सज्ज आहे. डेव्हिड वॉर्नर एकट्याच्या बळावर विजय मिळवून देऊ शकत नसल्यामुळे शिखर धवन आणि युवराजसिंग यांच्याकडूनही प्रत्येक सामन्यात यशस्वी कामगिरीची संघाला अपेक्षा असेल. प्रत्येक संघाच्या संतुलनाच्या आधारे मी हे अवलोकन केले आहे. मुंबई आणि कोलकाता हे प्रत्येक पर्वातील यशस्वी संघ आहेत. त्यामागे अनेक कारणे देता येतील. दोन्ही संघ वारंवार चांगला खेळ करतात. जवळपास दोन महिने चालणाऱ्या आयपीएलमध्ये सातत्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. (टीसीएम)
पुणे- गुजरातची गोलंदाजी कमकुवत
By admin | Published: April 15, 2017 4:29 AM