नवी दिल्ली : पुणे आणि राजकोट यांना मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या फ्रॅन्चायझींमध्ये स्थान मिळाले. या फ्रॅन्चायझींना निलंबित चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) व राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्या जागी स्थान देण्यात आले. पुणे संघाला कोलकाताच्या व्यवसायी संजीव गोयंका यांची कंपनी न्यू राइजिंगने विकत घेतले, तर राजकोट संघ इंटेक्स मोबाईलने विकत घेतला. गोयंका बीसीसीआयला प्रत्येक वर्षी १६ कोटी रुपये प्रदान करतील, तर इंटेक्स मोबाईल दोन वर्षांच्या करारासाठी १० कोटी रुपये देईल. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले, की नवी फ्रॅन्चायझी बोर्डाकडून एक पैसाही घेणार नसून उलट बोर्डाला पैसा प्रदान करणार आहेत.चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचे काही अधिकारी व संघाचे मालक २०१३ च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) आर. एम. लोढा समितीच्या चौकशीनंतर दोन्ही संघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघांना पुनरागमन करता येईल. दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला आणि नव्या संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अंतरिम संघ आपल्यासाठी खेळाडूंची निवड करताना सुरुवातीला एका ड्रॉफ्टमध्ये सहभागी होतील. चेन्नई व रॉयल्सच्या खेळाडूंची दोन गटांत विभागणी करण्यात येईल. आघाडीच्या खेळाडूंची विक्री ड्रॉफ्टच्या माध्यमातून करण्यात येईल. दोन्ही संघांकडे खेळाडू विकत घेण्यासाठी किमान ४० कोटी व जास्तीत जास्त ६६ कोटी रुपये असतील. ज्या खेळाडूंची निवड होणार नाही त्या खेळाडूंना लिलावासाठी उपलब्ध पूलमध्ये स्थान मिळेल. लिलाव ६ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. इंटेक्स दुसऱ्या खेळाडूची निवड करेल. त्यानंतर उभय संघ एक-एक खेळाडू निवडतील. निवड झालेल्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या करारानुसार रक्कम देण्यात येईल. अन्य संघांना पाच खेळाडू कायम राखण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पहिल्या खेळाडूला १२.५ कोटी, दुसऱ्या खेळाडूला ९.५ कोटी, तिसऱ्या खेळाडूला ७.५ कोटी, चौथ्या खेळाडूला ५.५ कोटी आणि पाचव्या खेळाडूला चार कोटी रुपये मिळतील. स्थानिक खेळाडूची निवड करण्यात आली, तर चार कोटी रुपये देण्यात येतील. फ्रॅन्चायझी आणि कायम राखण्यात आलेल्या खेळाडूंदरम्यान आयपीएलच्या शुल्काबाबत कुठला करार झाला असला, तरी निर्धारित शुल्कातून कायम राखण्यात आलेल्या खेळाडूसाठी निश्चित रकमेची कपात करण्यात येईल.अंतरिम संघांसाठी बोली लावणाऱ्या अन्य समूहांमध्ये आरपीजी प्रॉपर्टीजचे हर्ष गोयंका, अॅक्सिस क्लिनिकल आणि चेट्टीनाड सिमेंट यांचा समावेश होता. यांची बोली फ्रॅन्चायझी मिळवणाऱ्या समूहांच्या तुलनेत अधिक होती.बोली प्रक्रिया एक तास चालली आणि दोन टप्प्यात पूर्ण झाली. पहिल्या टप्प्यात बोली लावणाऱ्या पाचही समूहांची तांत्रिक व आर्थिक पात्रतेची चौकशी करण्यात आली. बीसीसीआयने १३ व १४ जानेवारी रोजी श्रीनगरध्ये फ्रॅन्चायझी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत ३-० ने विजय मिळवणाऱ्या संघाला दोन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. (वृत्तसंस्था)उभय संघांना रिव्हर्स लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून विकण्यात आले. त्यात मूळ किंमत ४० कोटी रुपये ठेवण्यात आली होती. बोलीमध्ये त्यापेक्षा कमी किमतीमध्ये बोली लावण्यात आली. सर्वांत कमी बोली लावणाऱ्यांना संघ विक ण्यात आले.- अनुराग ठाकूरबोली लावणाऱ्या पाच कंपन्यांनी ९ उपलब्ध शहरांपैकी एकापेक्षा अधिक शहराची निवड केली होती. इंटेक्सचा अपवाद वगळता उर्वरित चार समूहांच्या यादीमध्ये पुण्याचे नाव होते. न्यू राइजिंगने नागपूरसाठी उणे ११ कोटी रुपयांची बोली लावली होती. इंटेक्सनेही नागपूर व विशाखापट्टणमसाठी १०-१० कोटी रुपयांचा बोली लावली होती. चेट्टिनाडने पुणे व चेन्नईसाठी २७ कोटी रुपयांचा बोली लावली होती. आरपीजीने पुणेसाठी १७.८८ कोटी रुपये आणि राजकोटसाठी २०.८८ कोटी रुपयांची बोली लावली. इंटेक्सने कानपूर व विशाखापट्टणमसाठी १० कोटी रुपयांची बोली लावली. अॅक्सिसने नागपूर व कानपूरसाठी १५ कोटी रुपये आणि पुणेसाठी १० कोटी रुपयांची बोली लावली. - राजीव शुक्ला
पुणे, राजकोट आयपीएलच्या मैदानात
By admin | Published: December 08, 2015 11:54 PM