पुणे : रायझिंग पुणे सुपरजायंट्सला स्पर्धेतील आपले स्थान भक्कम करण्यासाठी विजयपथावर येणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी त्यांना गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या गुजरात लायन्सचे तगडे आव्हान परतवून लावावे लागेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी (दि. २९) ही लढत होत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर सलग चार सामन्यांत पुणे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीने पुणे संघाने विजय मिळविला असला तरी आव्हान कायम राखण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे. गुजरातने या हंगामात चांगली कामगिरी केली असून, त्यांच्या नावावर सहा सामन्यांत ५ विजय आहेत. केवळ सनरायजर्स संघाविरुद्ध त्यांचा पराभव झाला आहे. गुजरात लायन्सने पुण्याला राजकोट येथील सामन्यात ७ गडी राखून मात दिली होती. या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी पुण्याकडे आहे. लायन्सकडे अॅरॉन फिंच, ब्रँडन मॅक्युलम व कर्णधार सुरेश रैना यांसारखे तगडे फलंदाज आहेत. फिंच दुखापतीने त्रस्त असला तरी त्या जागी ड्वेन स्मिथने आपली भूमिका चोख बजावली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरोधात त्याने केवळ ३० चेंडूत ५२ धावांची तडाखेबाज खेळी केली. गोलंदाजीत ड्वेन ब्राव्हो, धवल कुलकर्णी यांनी चांगली कामगिरी केली असून, त्यांच्या नावावर अनुक्रमे सात व सहा बळी आहेत. प्रवीण तांबे व रवींद्र जडेजा या फिरकीपटूंनी अनुक्रमे पाच व चार बळी घेत त्यांना चांगली साथ दिली आहे. पुण्यासाठी अजिंक्य रहाणे व फाफ डू प्लेसिस या सलामीच्या जोडीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. अजिंक्यने २२३ व प्लेसिसने २०६ धावा फटकावल्या आहेत. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यासाठी स्टीवन स्मिथ व महेंद्रसिंह धोनी यांच्या बॅटमधून धावा झाल्या पाहिजेत. एम. आश्विन व थिसारा परेरा या फिरकी व जलद गोलंदाजांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. त्यांच्या नावावर अनुक्रमे सात व सहा बळी आहेत. अशोक डिंडाने हैदराबाद विरोधात ३ बळी घेतले आहेत. मात्र, रविचंद्रन आश्विन आपली कमाल दाखविण्यात आत्तापर्यंत अपयशी ठरला आहे. त्यामुळे यांना गोलंदाजीत कमाल दाखवावी लागेल. खेळाडूंना लय मिळविण्यासाठी तसेच आत्मविश्वास येण्यासाठी गुजरातविरुद्धचा विजय मिळविणे आवश्यक आहे. >पुणे संघाला झटका स्टार फलंदाज फाफ डू प्लेसीसच्या डाव्या हाताच्या बोटाला फॅक्चर झाल्यामुळे पुढील आयपीएल स्पर्धेत तो खेळू शकणार नसल्यामुळे पुणे संघाला मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी केव्हीन पिटरसनला दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले. आता डू प्लेसीसला बरे होण्यासाठी सहा आठवडे लागणार आहेत. दुसरीकडे पिटरसनच्या ऐवजी उस्मान ख्वाजाला संधी देण्यात येणार आहे. >रायझिंग पुणे सुपरजायंट्समहेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, उस्मान ख्वाजा, रविचंद्रन आश्विन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, इरफान पठाण, रुद्र प्रतापसिंग, रजत भाटिया, अंकित शर्मा, बाबा अपराजित, मुरुगन आश्विन, स्कॉट बोलँड, अंकुश ब्यास, अशोक डिंडा, जसकरम सिंग, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, पीटर हँडस्कॉब व अॅडम झम्पा.>गुजरात लायन्ससुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉल्कनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.
पुण्याला हवे ‘विन रायझिंग’
By admin | Published: April 29, 2016 2:41 AM