शिवाजी गोरे, पुणेकोस्तास कात्सोउरानीस आणि डेव्हिड ट्रेजेगेट यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे एफसी पुणे संघाने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत गोवा एफसी संघाचा दोन गोलने पराभव करून घरच्या मैदानावर विजयाची चव चाखली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात आज पुणे संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुण्यात खेळाडूंच्या निवासस्थानी पुणे संघाच्या खेळाडूंनी रात्री एकत्र लक्ष्मीपूजन केले. त्या वेळी त्यांनी नक्की घरच्या लढतीत विजय मिळण्यासाठी प्रार्थना केली असणारच. त्यामुळे त्यांचा गोवाविरुद्ध नियोजनबद्ध खेळ झाला. ४० व्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध गोल करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. ४२ व्या मिनिटात पुणे संघाच्या पाठीराख्यांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. मध्य रेषेजवळ पुणे संघाला पंचांनी फ्री किक दिली. इव्हान बोलाडोने ती किक मारली. प्रथम चेंडू गोलपोस्टच्या डाव्या बाजूस गेला. तेथून डॅनिएलने चेंडू गोलच्या दिशेने मारला, पण तो मध्येच गोव्याच्या खेळाडूने मोठ्या बॉक्सबाहेर मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू गोलपोस्टच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या कास्तासकडे गेला. त्याने कोणतीही चूक न करता चेंडू उजव्या पायाने गोलच्या दिशेने मारला. गोवा संघाच्या गोलरक्षकाला काही कळण्याच्या आत चेंडू जाळीमध्ये विसावला होता आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. मध्यंतराला पुणे संघ एक गोलने आघाडीवर होता. मध्यंतरानंतर गोवा संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्याचे गोल करण्याचे प्रयत्न पुणे संघाच्या बचाव फळीने हाणून पाडले. पुन्हा पुणे संघाच्या खेळाडूंनी ८१ व्या मिनिटाला एक चाल रचली. डॅनियल, ब्रुनो, आशितोष, गुरुंग यांनी एकमेकांना पास देऊन चेंडू गोलच्या दिनेश नेला. डेव्हिडकडे चेंडू असताना त्याने चेंडू गोलच्या दिशेने मारून संघाचा दुसरा गोल गेला. २-० गोलची आघाडी पुणे संघाकडे शेवटपर्यंत राहिली.
पुण्याने चाखली विजयाची चव!
By admin | Published: October 27, 2014 2:05 AM