ब्रिसबेन : पुणेकर पूजा घाटकरने राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत अभिमानाने भारतीय तिरंगा फडकावताना १० मीटर एअर रायफल गटात सुवर्ण वेध घेतला. त्याच वेळी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात भारतीय खेळाडूंनी एकहाती वर्चस्व राखत क्लीन स्वीप करताना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांवर कब्जा केला.महिलांच्या १० मीटर एअर रायफल गटात पूजाने शानदार कामगिरीसह सुवर्ण पटकावतानाच, अंजुम मोदगिलने रौप्यपदकावरनाव कोरले. या दोघींच्याधडाक्यापुढे सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसो हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.दरम्यान, या गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी तिसरी भारतीय मेघना सजनार पाचव्या स्थानी राहिली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात युवा नेमबाज शाहजार रिझवी याने चमकदार कामगिरी करताना ओंकार सिंग आणि जीतू राय यासारख्या कसलेल्या नेमबाजांना पिछाडीवर टाकले. निर्धारित २४ शॉटनंतर रिझवीने २४.७ गुणांसहसुवर्ण पक्के केले, तर ओंकार (२३६) आणि जीतू (२१४.१) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत अंजुमने दमदार सुरुवात केली. पहिल्या पाच शॉटदरम्यान ती आघाडीवर होती. मात्र, पूजाने १०व्या शॉटनंतर चित्र पालटले. हीच आघाडीअखेरपर्यंत कायम राखताना तिने सर्वाधिक २४९.८ गुणांसह सुवर्णपदक निश्चित केले. अंजुमने २४८.७ गुणांसह रौप्य पटकावले, तर मार्टिनाला २२४.८ गुणांसह कांस्यवर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)‘- दुसरीकडे, पुरुषांच्या स्कीट प्रकारात मेराज अहमद खान, अंगद वीर सिंग बाजवा आणि शीराज शेख यांनी १२५ पैकी ११९ गुणांची कमाई करतशूट आॅफमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.
पुणेकर पूजा घाटकर, रिझवीचा सुवर्णवेध; पुरुषांचा १० मीटर एअर पिस्तुलमध्ये क्लीन स्वीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:16 AM