पुणे : इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात पुणे संघ पुन्हा एकदा दिसणार आहे. या निमित्ताने पुण्यातील क्रिकेटपटूंना संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अंतिम अकरा जणांच्या संघात (प्लेईंग इलेव्हन) किती खेळाडूंना स्थान मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रत्येक शहराच्या नावे असलेल्या संघात स्थानिक खेळाडूंना संधी देणे अपेक्षित आहे. त्या नुसार पुणे वॉरियर्स संघाने काही शहरातील खेळाडूंशी करार केला होता. मात्र अपवाद वगळता पुणेरी खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले होते. शहरात केदार जाधव, धीरज जाधव, हर्षद खडीवाले, चिराग खुराना, अंकित बावणे, संग्राम अतितकर, अक्षय दरेकर, श्रीकांत मुंडे, डॉमनिक मुत्तुस्वामी, निखिल नाईक, राहुल त्रिपाठी, विजय झोळ यांसारखे रणजी खेळलेले अनेक खेळाडू आहेत. त्यामुळे यंदा पुणे संघात कोणत्या खेळाडूची वर्णी लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. बीसीसीआयने संघ रद्द केल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने पुणे होम ग्राऊंड असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर काही सामने देखील खेळविण्यात आले होते. मात्र आता पुण्याचा संघ आगामी मोसमात असल्याने पुण्यातील तमाम क्रिकेटप्रेमींना आपल्या शहराच्या संघाला पाठिंबा देता येणार आहे. चेन्नई व राजस्थान संघातील कोणते खेळाडू पुणे संघाकडून खेळतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आर्थिक कारणांवरुन सहारा ग्रुपच्या मालकीच्या पुणे वॉरियर्स संघाची फ्रँचायजी २०१३ साली रद्द करण्यात आली होती. सहाराने तब्बल १९ अब्ज रुपयांची बोली लावून हा संघ २०१० साली खरेदी केला होता. पुणे संघाने २०११ ते २०१३ या कालावधीत तीन आयपीएल मोसमात आपला सहभाग नोंदविला. सौरव गांगुली, युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, वायने पारनेल, जेसी रायडर, ग्रॅमी स्मिथ, वायने पारनेल, स्टीव्हन स्मिथ, मायकेल क्लार्क यांसारखे दिग्गज खेळाडू या संघाचे सदस्य होते. मात्र तिनही मोसमात पुण्याला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. (क्रीडा प्रतिनिधी)
पुण्यात दिसणार ‘पुणेरी’ चेहरा?
By admin | Published: December 08, 2015 11:51 PM