पुणे : यंदाच्या प्रो कबड्डीमध्ये १० सामन्यांतून केवळ एक विजय मिळवलेल्या पुणेरी पलटनने तब्बल ५ सामन्यांनतर विजयाची नोंद केली. यंदाच्या सत्रात घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात पुणेरी पलटनने झुंजार खेळाच्या जोरावर दबंग दिल्लीला ३३-२८ असे नमवले. बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या रंगतदार सामन्यात पुणेरी पलटनने पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यानंतर केलेला आक्रमक खेळ लक्षवेधी ठरला. निराशाजनक कामगिरीमुळे बाद फेरी गाठण्याच्या आशा कधीच मावळलेल्या पुणेरी संघ घरच्या मैदानावर विजयाच्या निर्धाराने उतरला खरा, मात्र दिल्लीकरांनी आक्रमक खेळ करुन मध्यंतराला १८-११ अशी मोठी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले. यावेळी पुन्हा एकदा पुणेरी पलटन हरणार असेच चित्र होते.मात्र, यानंतर त्वेषाने खेळ केलेल्या पुणेकरांनी सामन्याचे चित्रच पालटले. जितेश जोशीने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना सर्वाधिक १० गुणांची कमाई करुन पुण्याचा विजय साकारला. त्याने तुफान आक्रमण करताना ८ तर बचावामध्ये २ गुणांची कमाई केली. संजय कुमारने देखील खोलवर चढाया करुन ७ गुणांसह त्याला चांगली साथ दिली. दिल्लीकरांनी भक्कम बचाव करताना सुरुवातीला वर्चस्व राखले. मात्र दुसऱ्या सत्रात पुणेकरांच्या आक्रमक पवित्र्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. श्रीकांत तेवठीयाने दमदार अष्टपैलू खेळ केला. तसेच कर्णधार रवींदर पहल व दादासो आवाड यांनी भक्कम बचाव करताना दिल्लीकडून अपयशी झुंज दिली.(क्रीडा प्रतिनिधी)
पुणेकरांनी दिल्लीला झुकवले...
By admin | Published: August 16, 2015 10:39 PM