मुंबई : हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. फायनलच्या सामन्यात अभिजीतने एकतर्फी वर्चस्व राखले आणि हरयाणाच्या सोमविर याला 5-0 अशा गुणांनी पराभूत करत किताबावर नाव कोरले.
दरम्यान, अखिल भारतीय ॲमेच्युअर रेसलिंग फेडरेशन यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील शेकडो पैलवानांनी सहभाग घेतला होता. खरं तर चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचे दोन मल्ल दाखल झाले होते. फायनलच्या सामन्यात महाराष्ट्राच्याच पैलवानांमध्ये लढत होईल अशी अपेक्षा होती, मात्र हरयाणाच्या सोमविरने या आशेवर पाणी टाकले आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्या उपांत्य फेरीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना अटीतटीच्या लढतीत हरयाणाच्या सोमविर याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
हरयाणाच्या पैलवानाला दाखवलं 'अस्मान'दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत कटके याला पुढे चाल मिळाल्याने त्याने फायनलचे तिकिट मिळवले. फायनलच्या सामन्यात अभिजीतने एकतर्फी खेळ दाखवला आणि 5-0 ने मोठा विजय मिळवला. त्याने शक्ती आणि युक्तीचा बरोबर वापर करून हरयाणाच्या पैलवानाला चितपट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"