हाँगकाँग : आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या अवंतिका नरळेने रविवारी आणखी दोन पदकांची कमाई केली. तिने 200 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. भारताच्याच दीप्ती जीवांजीनंही कांस्यपदक जिंकले. अवंतिकानं 24.20 सेकंद आणि दीप्तीनं 24.78 सेकंदाची वेळ नोंदवली.
शनिवारी झालेल्या 100 मीटर शर्यतीत पुण्याच्या 15 वर्षीय अवंतिकाने 11.97 सेकंदाच्या वेळेसह बाजी मारली आणि युवा गटात आशियातील सर्वात जलद धावपटू होण्याचा मान पटकावला होता. या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 26 ( 8 सुवर्ण, 9 रौप्य व 9 कांस्य) पदकांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले.
वडील म्हणून अपेक्षा नाहीत, मुलीने खेळाचा आनंद लुटावा...अवंतिकाचे वडील संतोष हे प्लंबरचे काम करतात. अवंतिकाला वडगाव शेरी येथून स्वारगेटजवळील सणस मैदानावर सरावासाठी नेण्या-आणण्याची जबाबदारी तेच पार पाडतात. मुलीच्या यशाबाबत ते म्हणाले, ‘‘मुलीने इतक्या मोठ्या स्पर्धेत यश मिळवल्यावर साहजिकच उर अभिमानाने भरून आला. तिच्या यशात संजय पाटणकर आणि सुधाकर मेमाणे या प्रशिक्षकांचे योगदान सर्वाधिक मोलाचे आहे. मुलगी घेत असलेल्या मेहनतीला यश लाभल्याने तिच्या आईला विशेष आनंद झालाय.’’
मुलीकडून काय अपेक्षा आहे या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘वडील म्हणून मी मुलीकडून काय अपेक्षा ठेवणार? तिने यात करिअर करायचे ठरवले म्हटल्यावर आम्ही तिला पूर्णपणे पाठिंबा दिला. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती मेहनत घेत आहे. तिने सर्वस्व पणाला लावून धावावे आणि कोणतेही दडपण न घेता खेळाचा आनंद लुटावा, हीच माझी इच्छा आहे. माझ्या लेखी हेच यश आहे.’’
ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे!''दहावीच्या परिक्षेपेक्षा या स्पर्धेसाठी सरावावर मी जास्त लक्ष केंद्रित केले होते. इतक्या मोठ्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावल्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. प्रशिक्षक आणि आई-वडिलांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे माझे ध्येय आहे,'' असे अवंतिका नरळेने सांगितले.