- आॅनलाइन लोकमत
आरसीबीच्या हाराकिरीने पुणे संघाने रॉयल विजय मिळवत आयपीएल १० च्या गुणतक्त्यात चौथे स्थान पटकावले आहे. पुणे संघाचा विजयरथ मागच्या काही सामन्यांपासून वेगाने दौडत आहे. आधी हैदराबाद, मुंबई, आणि आता आरसीबीला पराभूत करत पुणे संघाने स्पर्धेत आपला दम दाखवून दिला. आजच्या सामन्यातील विजय हा गोलंदाजांच्या कामगिरीवर मिळवलेला आहे, असेच म्हणावे लागेल. ल्युकी फर्गसन याने तर आयपीएल १० च्या सत्रातील सर्वोत्तम स्पेल टाकला. त्याने चार षटकात फक्त ७ धावा देत दोन गडी बाद केले. त्यात एक षटक निर्धाव टाकण्याची कामगिरीही त्याने केली. त्याला जयदेव उनाडट, इम्रान ताहीर आणि वॉशिंग्टन सुंदर यांची चांगली साथ लाभली. या तिघांनीही आरसीबीची धावसंख्या नियंत्रित ठेवण्यात चोख भूमिका बजावली. फटकेबाजी न करता आल्याने आरसीबीचे फलंदाज आपला संयम राखू शकले नाही. आरसीबीकडून वाखणण्याजोगी फलंदाजी फक्त कर्णधार विराट कोहली याने केली. त्याने ४८ चेंडूत ५५ धावा केल्या. त्यात चार चौकार आणि एक षटकार होता. कोहलीने केलेल्या धावांएवढ्याही धावा इतर पूर्ण संघाला जमवता आल्या नाही. गेलच्या जागी ट्रॅव्हिस हेडला संधी देण्याचा निर्णय अपयशी ठरला. त्यापाठोपाठ डिव्हिलियर्स, केदार जाधव, सचिन बेबी, स्टुअर्ट बिन्नी हे बाद झाले. त्यामुळे आज पुन्हा एकदा आरसीबीच्या तुफान फटकेबाजीची क्षमता असलेली फलंदाजी १०० च्या आत तंबूत परतली. सुदैवाने आरसीबीचा संघ आज सर्वबाद झाला नाही. चहल आणि अरविंद यांनी ती वेळ आपल्या संघावर येऊ दिली नाही. मात्र २० षटके पूर्ण खेळूनही हा संघ ९६ धावांवरच बाद झाला. पुण्याकडून मिळालेल्या या पराभवानंतर आरसीबीचा संघ नवव्या स्थानावर घसरला आहे.