पुणे : गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवल्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट बुधवारी जबरदस्त आत्मविश्वासासह बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सशी भिडेल. मुंबईचा हा केवळ दुसराच पराभव होता; परंतु त्यांचे दोन्ही पराभव पुण्याविरुद्धच होते.कोलकाता सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असून गेल्या सामन्यात त्यांनी आरसीबीला केवळ ४९ धावांमध्ये गुंडाळून आयपीएल इतिहासातील विक्रमी कामगिरी केली. त्यामुळे पुणे संघाला गाफील राहून चालणार नाही. मुंबईविरुद्ध समाधानकारक मजल मारल्यानंतरही गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर पुणेकरांनी बाजी मारली. त्यामुळे कोलकाताविरुद्धही त्यांच्या गोलंदाजांकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल. शिवाय, मुंबईविरुद्ध स्मिथसह ऐन वेळी धोनीने केलेली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना निर्णायक ठरली होती. त्यामुळे कोलकातापुढे दोन कर्णधारांना तोंड देण्याचे कठीण आव्हान असेल.गोलंदाज चांगली कामगिरी करीत असले, तरी पुण्याची फलंदाजी अद्याप म्हणावी तशी बहरलेली नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या अजिंक्य रहाणेने मुंबईविरुद्ध दमदार फटकेबाजी करून संघात चैतन्य निर्माण केले. तसेच, त्याचा सलामीचा साथीदार राहुल त्रिपाठी चांगल्या फॉर्ममध्ये असून, पुण्याची खेळपट्टी चांगल्या प्रकारे ओळखून असल्याने कोलकातासाठी तो धोकादायक ठरू शकतो. त्याचप्रमाणे कर्णधार स्टीव्ह स्मिथ, महेंद्रसिंह धोनी, मनोज तिवारी आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्याकडून पुण्याला आशा आहेत. गोलंदाजीमध्ये स्टोक्स पुण्यासाठी मुख्य अस्त्र असेल. त्याने ज्या प्रकारे मुंबईला जखडून ठेवले, ते कौतुकास्पद होते. त्याचबरोबर, शार्दूल ठाकूरने मिळालेल्या संधीचे सोने करताना आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. अचूक टप्पा आणि वेगामध्ये विविधता यांवर भर देताना तो फलंदाजांना अडचणीत आणत आहे. त्याचबरोबर, इम्रान ताहिर व जयदेव उनाडकट यांचा माराही पुण्यासाठी निर्णायक ठरेल. दुसरीकडे, कोलकाताने आपल्या गतसामन्यात जबरदस्त प्रदर्शन करताना बलाढ्य फलंदाजांचा समावेश असलेल्या बेंगलोर संघाचा अवघ्या ४९ धावांमध्ये खुर्दा केला. गुजरात लायन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पुनरागमनाचे आव्हान असलेल्या कोलकाताने बेंगलोरचा अक्षरश: फडशा पाडताना इतर संघांना इशाराच दिला.नॅथन कुल्टर-नाइल, ख्रिस वोक्स आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी भेदक मारा करताना आरसीबीची हवाच काढली. त्याचप्रमाणे, सुनील नरेनच्या रूपाने कोलकाताला मिळालेला विध्वंसक सलामीवीर कोणत्याही गोलंदाजाची पिसे काढण्याची क्षमता राखून आहे. त्यामुळे त्याला लवकर बाद करणे, हेच पुणेकरांचे पहिले लक्ष्य असेल. याशिवाय कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, अष्टपैलू युसूफ पठाण व यादव अशी तगडी फलंदाजीही कोलकाताला बलाढ्य संघ बनवते. (क्रीडा प्रतिनिधी)
पुणेकरांचे लक्ष्य ‘मिशन केकेआर’
By admin | Published: April 26, 2017 1:16 AM