ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. 9 - अटीतटीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर 14 धावांनी मात करत किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे. ख्रिस लीनने केलेल्या झुंजार खेळीला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने हा सामना कोलकात्याच्या हातातून निसटला. आजच्या विजयाबरोबरच पंजाबच्या खात्यात 12 सामन्यांतून 6 विजय आणि 12 गुण जमा झाले आहेत. आता उर्वरित दोन्ही लढती जिंकल्यास प्लेऑफ फेरीत प्रवेश करण्याची संधी पंजाबकडे असेल.
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस लीन आणि सुनील नारायण यांनी कोलकात्याला दमदार सुरुवात रून दिली. मात्र नारायण बाद झाल्यावर कोलकात्याच्या धावगतीस ब्रेक लागला. एकीकडून लीन पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत असताना दुसऱ्या बाजूने गौतम गंभीर (8), रॉबिन उथप्पा (0), मनीष पांडे (18) यांनी साफ निराशा केली.
52 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 84 धावा कुटणारा लीन खेळपट्टीवर असेपर्यंत कोलकात्याला विजयाची आस होती. पण लीन 18 व्या षटकात धावबाद झाला आणि कोलकात्याच्या हातून सामना निसटला. शेवटी कोलकात्याला 20 षटकात 6 बाद 153 धावांपर्यंतच मजल मारता आली.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्याची मोकळीक दिली नाही. मनन व्होरा (25), मार्टिग गुप्टिल (12) आणि शॉन मार्श (11) हे झटपट बाद झाल्याने पंजाबची अवस्था 3 बाद 56 अशी झाली होती.
मात्र कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (25 चेंडूत 44 धावा) आणि वृद्धिमान साहा (33 चेंडूत 38 धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करत पंजाबला मोठ्या धावसंख्येतच्या दिशेने नेले. पण मॅक्सवेल बाद झाल्यानंतर पंजाबच्या धावसंख्येला पुन्हा खिळ बसला. अखेरच्या षटकांत राहुल तेवटिया (नाबाद 15) याने फटकेबाजी करत पंजाबला 6 बाद 167 धावांपर्यंत मजल मारून दिली. कोलकात्याकडून कुलदीप यादव आणि ख्रिस व्होक्सने प्रत्येकी दोन तर नारायण आणि उमेश यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला.