ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मॅच फिक्सिंग करणा-यांवर जरब बसवण्यासाठी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी टाकण्याच्या न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतरही या स्पर्धेत अद्यापही गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. ' किंग्स इलेव्हन पंजाब'च्या काही खेळाडूंची वागणूक संशयास्पद असून त्यांचा मॅच फिक्सिंगच्या प्रक्रियेत सहभाग असू शकतो ' असा गौप्यस्फोट पंजाब संघाची सहमालक प्रीती झिंटाने केल्याने एकच खळबळ माजली आहे. तसेच बीसीसीआयच्या भ्र्ष्टाचारविरोधी पथकाला आयपीएलमधील गैरप्रकार रोखण्यात आल्याचा आरोपही तिने केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
आयपीएल कार्यकारिणीच्या ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीसाठी आयपीएलचे फ्रँचाइजी मालकांसह चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर, खजिनदार अनिरुद्ध चौधरी व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली उपस्थित होते. त्यावेळी प्रीतीने बीसीसीआय अधिका-यांशी संघातील खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये असलेल्या सहभागाबाबत चर्चा केली.
आयपीएल स्पर्धेदरम्यान पंजाब संघाचे काही सामने हे निकाल आधीच निश्चित असल्याप्रमाणे सुरू होते, असे आपल्याला वाटल्याचे प्रीतीने सांगितले. सामना सुरू असताना काही लोक निकालाविषयी भविष्य वर्तवत असत व ते तंतोतंत खरे ठरत असे, त्यामुळे आपल्याला संशय आला, असे प्रीतीने म्हटले आहे. सायकॉलीजीची (मानसशास्त्र) विद्यार्थिनी असल्याने आपण खेळाडूंच्या देहबोलीचा अभ्यास करू शकतो तसेच (काही वेळा) त्यांचे मनही वाचू शकत असू, असेही प्रीतीने या बैठकीदरम्यान सांगितले. काही खेळाडूंचे वर्तन संशयास्पद वाटले तेव्हा आपण त्यांना खडसावले तर काहींना सामन्यात खेळू दिले नाही तर काहींची संघातून हकालपट्टीही केली, असेही ती म्हणाली. याप्रकरणी आपल्याला संबंधितांना आधीच माहिती द्यायची इच्छा होती, मात्र पुरेसे पुरावे हातात नसल्याने आपण गप्प राहिल्याचे प्रीतीने सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर 'आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे' असे प्रीतीने आज म्हटले आहे.
कोलकाता येथे २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बीसीसीआयचे विधी सल्लागार यु.एन. बॅनर्जी यासंदर्भात अहवाल सादर करणार आहेत.