नवी दिल्ली : विश्वचषकाची उपांत्य फेरी संपताच ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’ पुरस्काराच्या चढाओढीत अनेक खेळाडूंची भर पडल्यामुळे चुरस वाढली आहे. न्यूझीलंडने वेलिंग्टन येथे वेस्ट इंडीजचा पराभव करताच शनिवारी उपांत्यपूर्व फेरी संपली. आता २४ मार्च रोजी पहिला उपांत्य सामना द. आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यात आणि २६ मार्च रोजी दुसरा उपांत्य सामना भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाईल. उपांत्य फेरी गाठणाऱ्या या चारही संघांतील अनेक खेळाडू ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’साठी दावेदार आहेत. २०११च्या विश्वचषकाचा चॅम्पियन भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग याने हा पुरस्कार जिंकला होता. त्याने ९ सामन्यांत ३६२ धावा ठोकल्या व १५ गडी बाद केले होते. सध्याच्या स्पर्धेत ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’च्या दावेदारीत न्यूझीलंडचा द्विशतकवीर मार्टिन गुप्तिल आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, द. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स, आॅस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क व भारताचा शिखर धवन, मोहंमद शमी व कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश आहे. लंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने सलग ४ शतके ठोकण्याचा विक्रम नोंदवून ७ सामन्यांत आतापर्यंत सर्वाधिक ५४१ धावा केल्या आहेत; पण त्याचा संघ स्पर्धेबाहेर पडला. गुप्तिलने नाबाद २३७ धावांवर एकूण ४९८ धावा करून दुसरे स्थान पटकावले. झिम्बाब्वेचा ब्रँडन टेलर ४३३ धावांसह तिसऱ्या आणि डिव्हिलियर्स ७ सामन्यांत ४१७ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने ७ सामन्यांत सर्वाधिक १९ गडी बाद केले. आॅस्ट्रेलियाचा स्टार्क १८ बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा लेगस्पिनर डॅनिअल व्हेट्टोरी आणि द. आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीर यांनीदेखील प्रत्येकी १५ गडी बाद केले आहेत. उपांत्य फेरीत बाजी मारून जे दोन संघ अंतिम फेरीत धडक देतील, त्या संघातील खेळाडूंना हा पुरस्कार जिंकण्याची चांगली संधी राहील. (वृत्तसंस्था) शिखरने ७ सामन्यांत ३६७ धावा, तर विराटने ३०४ धावा केल्या. उपांत्य फेरीतील एक चांगली खेळी या दोन्ही फलंदाजांना या पुरस्काराच्या चढाओढीत पुढे नेऊन ठेवेल. धोनीने ७ सामन्यांत १७२ धावा केल्या असून, यष्टीमागे त्याचे १५ झेल आहेत. दोन सामन्यांतील यशस्वी कामगिरी त्याला या पुरस्काराच्या चढाओढीत पुढे नेऊ शकते. मोहंमद शमी १७ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.
‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’साठी चुरस
By admin | Published: March 22, 2015 1:16 AM