ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 8 - रांचीमध्ये होणा-या तिस-या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श मालिकेच्या उर्वरीत दोन सामन्यांना मुकणार आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील दोन सामने खेळू शकणार नाही.
उपचारासाठी मार्श मायदेशी परतणार आहे, ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओथेरेपिस्ट डेव्हिड बीकले यांनी याबाबत माहिती दिली. मिशेलच्या खांद्याला आधीपासूनच दुखापत होती मात्र, आतापर्यंत आम्ही सांभाळून घेत होतो. पण आता तो खेळूच शकत नाही इतकी त्याची दुखापत वाढली असल्याची माहिती बीकले यांनी दिली.
तर,ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी 'मिशेल मागच्या उन्हाळ्यापासूनच दुखापतग्रस्त होता. पण आता त्याची दुखापत जास्त वाढल्याचं म्हटलं.
कोण घेणार जागा-
मिशेल मार्शची जागा एखादा अष्टपैलू खेळाडूच घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्लेन मॅक्सवेलचं नाव यामध्ये आघाडीवर आहे. याशिवाय उस्मान ख्वाजा, मार्कस स्टॉनिश आणि हिल्टन कार्टराइट यांचं नावंही चर्चेत आहे.
बंगळुरू कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारत-ऑस्ट्रेलिया मालिका रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे.ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करून भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.