नागपूर : वेगवान गोलंदाज डेल स्टेन अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसून तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम अमलाने स्पष्ट केले. भारताविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना अमला म्हणाला, ‘डेल स्टेन कदाचित या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. तो दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. स्टेन संघात नसणे आमच्यासाठी मोठा धक्का आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाजाविना खेळणे चांगली बाब नाही. आमच्याकडे दर्जेदार राखीव खेळाडू आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.’दक्षिण आफ्रिका संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. आमच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, असे कबूल करताना अमलाने परिस्थिती बदलेल, अशी आशा व्यक्त केली. अमला पुढे म्हणाला, ‘आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. मोहालीमध्ये आम्ही लढत दिली. भारतीय संघ २०० धावा केल्या तर आम्ही १८७ धावांची मजल मारली होती. त्यावेळी लढत बरोबरीत होती. अखेरच्या डावापर्यंत आम्ही शर्यतीत होतो, पण गेल्या लढतीत आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली नाही. आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. येथे आमची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, अशी आशा आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)
स्टेनमुळे धक्का : अमला
By admin | Published: November 24, 2015 11:58 PM