मुंबई : राज्याच्या कारभारात खेळ हा दूर्लक्षित राहिलेला घटक आहे, पण आम्ही पुन्हा खेळाला प्राधान्य क्रम देणार आहोत, पुढच्या आॅलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू देशाला पदक मिळवून देण्यात यशस्वी होतील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. राज्य बॅडमिंटन संघटनेतर्फे सिंधू आणि गोपिचंद यांचा सत्कार सोहळा मुख्यंत्र्याच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ‘रिओ’मधील पदक विजेत्या सिंधू, ललिता बाबरला ७५ लाखांसह महाराष्ट्रातील इतर आॅलिम्पिकवीरांसाठी एकूण सव्वापाच कोटी रुपये बक्षिसाची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री म्हणाले, आजची नवी पिढी टिव्ही आणि मोबाईल गेमध्येच रमलेली असते, मातीतील खेळापासून ही पिढी वंचित रहात आहे, म्हणून खेळाचे ज्ञान त्यांना लहानपणीच समवून सांगणे आणि पटवून देण्याची आवश्यकता आहे. राज्याची क्रीडा परंपरा देदिप्यमान आहे, आपल्याकडे भरपूर मैदाने आहेत पण ती आज ओस पडत चालली आहेत. त्याची निगा आणि व्यवस्थापन करणे आज आव्हान बनले आहे, पण केवळ मैदान आणि सुविधाही असणे पुरेसे ठरणार नाही कारण खेळाडू घडवण्यासाठी गोपीचंदसारखे प्रशिक्षक आणि सरावात झोकून देणाऱ्या सिंधू सारख्या खेळाडू हव्यात असे मुख्यमंत्री म्हणाले.गोपीचंद यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय क्रीडा क्षेत्राचे वास्तव मांडले, लहाणपणापासून क्रीडा प्रशिक्षण किती गरजेचे आहे हे ठासून सांगितले. खेळाच्या ज्ञानाचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे. त्यानंतर मैदानाची संख्या आणि सुविधा अशा क्रमाने प्रगती करता येते, असे त्यांनी सांगितले.
पी.व्ही. सिंधू, ललिता बाबरला राज्य शासनाचे ७५ लाख
By admin | Published: September 07, 2016 3:34 AM