बर्गिंहॅम : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने (PV Sindhu) राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) मध्ये सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले आहे. तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर सिंधूने रौप्य पदकाची सीमा ओलांडली आणि सुवर्ण पदकाला गवसणी घातली. फायनलच्या सामन्यात सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५ २१-१३ असा पराभव केला. विक्रमी पदक जिंकताच सिंधूला रडू कोसळले आणि ती भावूक झाली. आपल्या मनात मागील ८ वर्षांपासून असलेली जखम भरून काढून सिंधूने इतिहास रचला. सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १९ झाली असून पदक पदक जिंकण्याच्या बाबतीत भारताने न्यूझीलंडला मागे टाकले आहे.
सिंधूने अखेर सुवर्ण जिंकलेसिंधूची फायनलची लढत कॅनडाच्या मिशेल ली सोबत पार पडली. सिंधूने मिशेल लीला ६ महिन्यांपूर्वी देखील चितपट केले होते. सिंधूने नेट नजिकचा खेळ करताना गुण घेण्याचा डाव रचला आणि ३-१ अशी आघाडीमुळे तो यशस्वीही ठरताना दिसला. मिशेलला कोर्टवर सिंधूने व्यग्र ठेवले. सुरुवातीचा फटका मागे मारल्यानंतर दुसरा फटका नेट जवळ खेळून सिंधूने गुणसंख्या वाढती ठेवली. मिशेलने हळुहळू सामन्यात कमबॅक करण्यास सुरुवात केली आणि गेममध्ये ४-४ अशी बरोबरी घेतली. सिंधूचा डाऊन दी लाईन स्मॅश पाहण्यासारखा होता. सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली.
ब्रेकनंतर दोन्ही खेळाडूंचा खेळ उंचावलेला दिसला. दोघींमध्ये ३० फटक्यांची रॅली पाहताना चाहते सुखावले होते आणि सिंधूने ती रॅली जिंकून १५-९ अशी आघाडी वाढवली होती. सिंधूच्या प्रहारासमोर कॅनेडीयन खेळाडू कोर्टवर कोसळलेली दिसली. सिंधूने बॉडीलाईन स्मॅश मारत तिला हतबल केले. सिंधूने २१-१५ असा पहिला गेम घेतला. ( PV Sindhu takes the 1st game 21-15).मिशेलने दुसऱ्या गेममध्ये आक्रमक सुरुवात करताना गुण घेतले. सिंधूने यावेळेस चतुराई दाखवली अन् मिशेलच्या आक्रमणाला बचावात्मक खेळाने उत्तर देत चूका करण्यास भाग पाडले. मिशेलकडून चूका होत गेल्या अन् सिंधूने ११-५ अशी आघाडी घेतली.
सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या प्रत्येक फटक्याला प्रत्युत्तर दिले आणि जबरदस्त चाललेल्या रॅलीत पुन्हा कॅनेडीयन खेळाडूला कोर्टवर लोटांगण घालायला लावले. दोघींमध्ये रॅलीचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. सिंधूकडे १३-९ अशी होती. २३व्या गुणासाठी दोन्ही खेळाडूंमध्ये ५०+शॉट्सची रॅली रंगली अन् ती मिशेलने जिंकली. सिंधू थकलेली पाहायला मिळत होती आणि त्यामुळे भारतीय चाहत्यांची धाकधुक वाढली होती. सिंधूकडे १६-१२ अशी आघाडी होती, पण मिशेलच्या खेळाचा स्थर उंचावत चालला होता. सिंधूने दुसरा गेम २१-१३ असा जिंकून सुवर्णपदक नावावर केले.
रौप्य पदाची सीमा ओलांडून मिळवले सुवर्ण डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत २०१८मध्ये मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८मध्ये तिला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१४मध्ये तिने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. २०२२मध्ये तिला मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक कायम राखता आले नाही आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
जिआ मिनचा केला होता पराभवपी. व्ही सिंधूने उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या जिआ मिन येओवर २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला होता. सिंधूला २०१९च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीच्या रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, परंतु यंदा त्याचे रुपांतर तिने सुवर्णपदकात केले आहे आहे. २०१८मध्ये सिंधूने मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले होते, तर २०२२मध्ये याच गटात रौप्यपदकही नावावर आहे. २०१४ मध्ये महिला एकेरीत कांस्यपदकाची तिने कमाई केली होती.