PV Sindhu to get married Who is Venkata Datta Sai : भारतीय बॅटमिंटन स्टार आणि दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधू लग्नबंधनात अडकणार आहे. बॅडमिंटन कोर्टवरील सर्वोच्च कामगिरीसह भारतीय बॅडमिंटन खेळाचा जगभरात दबदबा निर्माण करणारी सिंधू ही कुणासोबत तरी डेटिंग करत असल्याची चर्चा रंगत असताना तिच्या लग्नाची सुपारी फुटल्याची बातमी समोर आलीये. एवढेच नाही तर महिन्याभरातच ती आपल्या नव्या संसाराला सुरुवात करणार आहे. आता सिंधू नवरी होऊन नटणार म्हटल्यावर अनेकांना या 'फुलराणी'चा राजा कोण? असा प्रश्न पडणार नाही असं कसं होईल. इथं जाणून घेऊयात पीव्ही सिंधूच्या लग्नासह तिच्या होणाऱ्या नवरोबासंदर्भातील खास स्टोरी
लग्नाची तारीखही ठरली
जगातील मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा भारताला पदक मिळवून देणारी पीव्ही सिंधू याच महिन्यात म्हणजे २२ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. रविवारी लखनऊ येथे पार पडलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत तिने जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर तिच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.
कोण आहे 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा होणारा राजा?
पीव्ही सिंधूनं हैदराबादच्या व्यंकट दत्ता साई यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आहे. वेंकट दत्ता साई हे पोसाइडेक्स टेक्नोलॉजीसमध्ये कार्यकारी संचालक आहेत. सिंधूचे वडील पीव्ही रमना यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबिय एकमेकांना ओळखतात. पण लग्नासंदर्भातील निर्णय हा महिन्याभरात ठरला. जानेवारीनंतर पीव्ही सिंधू वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळेच लग्नाचा मुहूर्त काढण्यात घाई केली, असेही ते म्हणाले आहेत.
लग्नानंतर रिसेप्शन अन् मग असा असेल पीव्ही सिंधूचा पुढचा प्लान
दोन्ही कुटुंबियांनी मिळून २२ डिसेंबर रोजी लग्नाचा मुहूर्त पक्का केला आहे. त्यानंतर २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. त्यानंतर पीव्ही सिंधू आगामी स्पर्धेच्या दृष्टिने पुन्हा ट्रेनिंग सत्रात बिझी होईल, अशी माहिती देखील तिच्या वडिलांनी दिली आहे. लग्नाआधी २० डिसेंबरपासून लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांचा लग्नसमारंभाचा सोहळा हा उद्यपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.