P V Sindhu, Tokyo Olympic: भारताची बॅडमिंटन क्वीन पी.व्ही.सिंधू हिनं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत नवा इतिहास रचला. सलग दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सिंधूनं याआधी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं चीनच्या बिंग जिओवर २१-१३, २१-१५ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.
पी.व्ही.सिंधूच्या उल्लेखनीय कामगिरीवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण सिंधूच्या या यशामागे गेल्या अनेक वर्षांपासूनची खडतर मेहनत आहे. आजवर तिला अनेक अडथळ्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. तेव्हा कुठे आज पी.व्ही.सिंधूनं जागतिक महिला बॅडमिंटनमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पीव्ही सिंधूला आतापर्यंत राजीव गांधी खेलरत्न (२०१६) आणि अर्जुन पुरस्कारनं (२०१३) सन्मानित करण्यात आलेलं आहे. यासोबतच तिला पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानंही गौरविण्यात आलं आहे.
सिंधूचा सुरुवातीचा खडतर प्रवाससिंधूच्या करिअरवर नजर टाकली तर लक्षात येईल की तिनं बॅडमिंटनला खूप वेळ देऊन त्यासाठी खूप संघर्ष केला आहे. नव्या तांत्रिक गोष्टींचा अंगिकार करुन स्वत:ची एक वेगळी स्टाइल तयार केली. तिचा जन्म ५ जुलै १९९५ साली हैदराबादमध्ये झाला. तिचे वडील पी.व्ही.रमण्णा आणि आई पी. विजया राष्ट्रीय स्तरावर वॉलीबॉल खेळले आहेत. पी.व्ही.रमण्णा देखील अर्जुन पुरस्कार विजेते राहिले आहेत.
२००१ साली पुलेला गोपीचंद यांच्या ऑल इंडिया इंग्लंड चॅम्पियनशीपचा किताब जिंकल्यानंतर सिंधूनं आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू होण्याचा निर्धार केला. वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी सिंधूनं हातात रॅकेट घेतलं आणि या खेळाप्रती तिनं स्वत:ला झोकून दिलं.
आजवरचा संघर्ष२००९ साली सिंधूनं कोलंबोमध्ये ज्युनिअर आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला होता. सिंधूची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरली होती. २०१२ साली लंडन ऑलिम्पिकची चॅम्पियन ली जुरेई हिचा पराभव करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सप्टेंबर २०१२ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी सिंधूचा जगातील टॉप-२० महिला बॅडमिंटनपटूंमध्ये समावेश झाला. २०१३ साली वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत सिंधूनं या स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक जिंकून दिलं होतं. त्यानंतर २०१५ हे साल वगळता तिनं २०१९ सालापर्यंत प्रत्येक वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत पदकाची कमाई केलेली आहे.