वुहान (चीन) : गिमचियोनमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर तीन वर्षांनी आज मंगळवारपासून येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. सिंधू या वेळी स्पर्धेत पदक पटकावण्यास उत्सुक आहे. रिओ आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने जानेवारी महिन्यात सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. याच महिन्यात सिंधू इंडिया ओपन चॅम्पियन ठरली होती. हैदराबादच्या २१ वर्षीय सिंधूला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार दिया आयुस्टिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मलेशिया ओपनच्या पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सिंगापूर ओपनमधून माघार घेणारी हैदराबादची सायना नेहवाल आपल्या मोहिमेची सुरुवात वुहान स्पोर्ट््स सेंटरमध्ये जपानच्या सयाका सातोविरुद्ध करणार आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाने जपानच्या खेळाडूविरुद्ध सातपैकी सहा लढतींमध्ये विजय मिळवला आहे. गेल्या विश्व रँकिंगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे स्थान मिळवणाऱ्या अजय जयरामला पुरुष एकेरीत पाचवे मानांकन प्राप्त चीनच्या टियान हाउवेईच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हाउवेईने रविवारी चीन मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावले. मलेशिया व सिंगापूर ओपनमध्ये न खेळणारा एच. एस. प्रणयला पहिल्या फेरीत आठव्या मानांकित हाँगकाँगच्या एनजी का लोंग एंगससोबत लढत द्यावी लागेल. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत झेंग सिवेई व चेन किंगचेन या चीनच्या अव्वल मानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. महिला दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा व सिक्की यांना चेई यू जुंग व किम सो योंग या कोरियन जोडीसोबत लढत द्यावी लागेल, तर मेघना व पूर्विशा एस. राम यांची लढत जुंग क्युंग युन व शिन स्युंग चान या कोरियाच्या जोडीसोबत होईल. पुरुष दुहेरीमध्ये भारतीय जोडी मनू अत्री व बी. सुमित रेड्डी यांना पहिल्या फेरीत फु हाईफेंग व झांग नान या पाचव्या मानांकित चीनच्या जोडीसोबत लढत द्यावी लागेल. (वृत्तसंस्था)
पीव्ही सिंधूची नजर जेतेपदावर
By admin | Published: April 25, 2017 1:04 AM