लंडन : भारत दौऱ्यात इंग्लंड फलंदाजांपुढे स्टार आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचे सर्वांत मोठे आव्हान राहणार असून, त्याच्याविरुद्ध खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे मत इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने व्यक्त केले. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत ९ नोव्हेंबरपासून राजकोटमध्ये सुरू होत आहे. भारताने १५ सदस्यांच्या संघात ३ फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. त्यांत रविचंद्रन आश्विन, अमित मिश्रा व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. इंग्लंड संघ २०१२मध्ये भारत दौऱ्यावर आला होता, त्या वेळी आश्विनने ४ सामन्यांत केवळ १४ बळी घेतले होते; पण त्यानंतर आश्विनच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून येते.पीटरसन म्हणाला, ‘‘आश्विन शानदार गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता असून, तो फलंदाजांना नेहमी अडचणीत आणतो. तो नेहमी आक्रमक गोलंदाजी करतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास प्रयत्नशील असतो.’’ आश्विनने भारतात खेळलेल्या २२ कसोटी सामन्यांत आतापर्यंत १५३ बळी घेतले आहेत.२०११नंतर मायदेशात खेळल्या गेलेल्या लढतीत प्रत्येक विजयात आश्विनने योगदान दिले आहे. भारताने अलीकडेच न्यूझीलंडचा ३-० ने सफाया केला. आश्विनने त्या मालिकेत २७ बळी घेऊन ‘मालिकावीरा’चा पुरस्कार पटकावला. मालिकेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर आश्विनने आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. पीटरसन स्वत:च्या फलंदाजीबाबत म्हणाला, ‘‘भारतात चौकार सहज मिळत नाहीत. त्यासाठी स्ट्राइक रोटेट करणे आवश्यक असते. ज्या वेळी मी फलंदाजी करीत होतो, त्या वेळी हेच तंत्र अवलंबले होते. मी भारतात फलंदाजीचा पूर्ण आनंद घेतला आणि अधिक धावा फटकावल्या.’’इंग्लंड संघाने यापूर्वीच्या भारत दौऱ्यात २-१ ने मालिका जिंकली होती. त्या मालिकेत पीटरसनने ३३८ धावा फटकावल्या होत्या. पीटरसनने इंग्लंडला आश्विनव्यतिरिक्त स्टार फलंदाज विराट कोहलीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पीटरसन म्हणाला, ‘‘कोहली सध्या शानदार फॉर्मात आहे. इंग्लंड संघात फॉर्मात असलेल्या जो रुटचा समावेश आहे; पण रुटची कोहलीसोबत तुलना करणे चुकीचे ठरेल. कोहली नेहमी आक्रमक क्रिकेट खेळण्यास प्रयत्नशील असतो. त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. तो स्वत: चकमदार कामगिरी करून सहकाऱ्यांपुढे आदर्श ठेवतो.’’ (वृत्तसंस्था) >आश्विनचा ‘दुसरा’ इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. मी त्याच्याविरुद्ध खेळलो त्या वेळी ‘दुसरा’ खेळण्यास सक्षम होतो; पण सध्याच्या संघातील फलंदाजांना ‘दुसरा’ खेळताना अडचण भासू शकते. भारतात फिरकीपटूंचा चेंडू अधिक उसळत नसल्यामुळे फलंदाजांना तो समजण्यास अडचण येते. हा सर्व खेळाचा भाग असून, भारतात खेळताना या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असायला हवे.-केविन पीटरसन
इंग्लंडपुढे आर. आश्विनचे सर्वांत मोठे आव्हान
By admin | Published: November 04, 2016 4:20 AM