टोरंटो : दोन भारतीय ग्रँडमास्टरमध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात आर. प्रज्ञानानंदने बाजी मारताना विदित गुजरातीला पराभूत केले. यासह प्रज्ञानानंदने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विजयी एका गुणाची कमाई केली. दुसरीकडे, प्रज्ञानानंदची बहीण आर. वैशाली हिनेही विजयी कूच केली.
प्रज्ञानानंद-वैशाली ही या स्पर्धेत सहभागी झालेली भाऊ-बहिणींची पहिली जोडी आहे. वैशालीने बल्गेरियाच्या नुर्गयुल सेलिमोवा हिचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. महिला गटात रविवारी केवळ याच लढतीचा निकाल लागला, बाकी सर्व लढती बरोबरीत सुटल्या. पुरुष गटात डी. गुकेश याला रशियाच्या इयान नेपोमनियाची याचा भक्कम बचाव भेदण्यात यश आले नाही. फ्रान्सचा फिरोझा आणि अमेरिकेच्या फाबियानो करुआना यांची लढत बरोबरीत सुटली.
गुकेश आघाडीवरपुरुष गटात भारताचा गुकेश हा करुआना आणि नेपोमनियाची यांच्यासह प्रत्येकी २ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहे. यानंतर विदित आणि प्रज्ञानानंद हे भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांचे प्रत्येकी १.५ गुण आहेत. महिलांमध्ये झोंगयी २.५ गुणांसह अव्वल आहे. रशियाच्या अलेक्झांद्रा गोरयाचकिना २ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून हंपी, वैशाली आणि लेगनो प्रत्येकी १.५ गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.