Rafael Nadal Angry Viral Video: स्पेनचा स्टार टेनिसपटूराफेल नदाल याने विम्बल्डन स्पर्धेत चौथी फेरी गाठली. नदालने शनिवारी तिसऱ्या फेरीत २७व्या मानांकित लोरेन्झो सोनेगोचा ६-१, ६-२, ६-४ असा पराभव केला. द्वितीय मानांकित नदाल २००८ आणि २०१० मध्ये विम्बल्डल चॅम्पियन होता. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी नदालचा सामना नेदरलँडच्या बोटिक व्हॅन डी जॅंडस्चल्पशी होईल. लोरेन्झो सोनेगो विरुद्धच्या सामन्यात नदाल काहीसा संतापल्याचे दिसून आले. इटलीच्या सोनेगोने कोर्टवर केलेल्या गोंगाटामुळे नदाल अस्वस्थ झाला होता. या मुद्द्यावर आपली नाराजी व्यक्त करताना नदाल काहीसा संतापला. त्यानंतर मात्र दोघे एकमेकांशी चर्चा करताना दिसले आणि सामना शांतपणे पार पडला. पाहा व्हिडीओ-
घडलेल्या घटनेबाबत नदालने सोनेगोची माफी मागितली. नदाल म्हणाला, 'जे काही झाले ते चुकीचे होते. मी त्याला नेटवर बोलवायला नको होते. मी त्याची माफी मागतो. ती माझी चूक आहे. मला माझी चूक समजली आहे. मी लॉकर रूममध्ये याबद्दल बोललो होतो. मी फक्त एवढेच सांगू शकतो की मी त्याला प्रत्यक्ष ओळखतो. तो माझा मित्र आहे. मला त्याला त्रास द्यायचा नव्हता. पण जे झालं ते चुकीचं घडलं", असे स्पष्टीकरण नदालने दिले.
वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून नदालने रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांचा सर्वाधिक २०-२० ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रम मोडला. त्यानंतर नदालने नेदरलँड्सच्या कॅस्पर रुडचा सरळ सेटमध्ये पराभव करून गेल्या महिन्यात विक्रमी १४वे फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले. हे त्याचे २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद होते. त्यानंतर आता नदालने विम्बल्डन स्पर्धेतही दमदार घोडदौड सुरूच ठेवत चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.