लाल मातीचा राजा म्हणून ओळख असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल यानं जागतिक टेनिस विश्वातील मानाची स्पर्धा असणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतंही खेळू शकणार नसल्याचं म्हटलं आहे. राफेल नदाल याचा काही दिवसांपूर्वीच सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून फ्रेंच ओपन स्पर्धेत पराभव झाला होता. नदालनं विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतल असल्याची माहिती ट्विटर हँडलवरुन दिली आहे.
विम्बल्डन आणि ऑलिम्पिक या दोन्ही महत्वाच्या स्पर्धांमधून माघार घेण्याचं कारण फिटनेस असं नदालनं दिलं आहे. पुढंही अधिककाळापर्यंत टेनिस खेळता यावं यासाठी मला शरीराला आराम देण्यासाठी या स्पर्धांमधून माघार घ्यावी लागत असल्याचं नदालनं म्हटलं आहे. विम्बल्डन आणि ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय नक्कीच सोपा नव्हता. पण माझ्या टीमसोबत मी चर्चा केल्यानंतर हाच योग्य निर्णय असल्याची जाणीव निर्माण झाली आहे, असंही नदालनं स्पष्ट केलं आहे. येत्या २८ जूनपासून विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत नदालला पराभवाचा धक्काफ्रान्समध्ये पार पडलेल्या फ्रेंच ओपनमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचने राफेलला उपांत्य फेरीत पराभूत केले आणि अंतिम सामन्यात स्टेफानोस त्सिस्तीपासवर मात करुन स्पर्धेचे जेतेपद मिळवलं. दरम्यान नदाल आणि नोवाक यांच्यातील सामना चुरशीचा झाला होता. सामन्याची सुरुवात नदालने जोरदार केली. बघता बघता त्याने पहिल्या सेटमध्ये ५-० ची आघाडी घेतली. पण नोवाकने पण तीन गेम जिंकत सामन्यात चुरस बनवून ठेवली. पहिला सेट नदालने ६-३ च्या फरकाने जिंकला होता. पण दुसऱ्या सेटमध्ये नोवाकने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवत ५-३ ने आघाडी घेतली नंतर राफेलनेही कडवी झुंज देत स्कोअर ६-५ केला. सामना टाय ब्रेकमध्ये पोहोचताच निर्णायक सेट नोवाकने ७-४ ने जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.