पॅरिस : राफेलन नदालने अंतिम लढतीत नोव्हाक जोकोव्हिचचा ६-०, ६-२, ७-५ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत १३ व्यांदा जेतेपदाचा मान मिळविताना कारकिर्दीतील २० वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. यासह त्याने रॉजर फेडररच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद विश्वविक्रमाची बरोबरी साधली. फ्रेंच ओपनमध्ये हे नदालचे विक्रमी १३ वे विजेतेपद आहे.
एकतर्फी ठरलेल्या लढतीत नदालने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जोकोव्हिचने तिसऱ्या सेटमध्ये संघर्षपूर्ण खेळ केला, पण नदालला जेतेपदापासून रोखण्यात अखेर तो अपयशीच ठरला. या पराभवामुळे जोकोव्हिचचे १८ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
फ्रेंच ओपनमध्ये नदाल-जोको एकूण आठव्यांदा भिडले. यामध्ये नदालने ७वेळा, तर जोकोने केवळ एकदा बाजी मारली आहे. तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धेत दोघे नवव्यांदा अंतिम फेरीत खेळले. यामध्येही नदालने वर्चस्व राखत ५ वेळा बाजी मारली असून ४ वेळा जोको जिंकला आहे. उपांत्य फेरीत नदालला बराच संघर्ष करावा लागला होता.