लंडन : लॉर्डस्च्या वेगवान खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेने झुंजार शतकी खेळी करताना इंग्लंडविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात भारताला ९ बाद २९0 पर्यंत पोहोचवले.एकवेळ ७ बाद १४५ अशी अवस्था असताना भारतीय संघाचा डाव २00 धावांत आटोपणार अशीच स्थिती होती; परंतु रहाणेने १५४ चेंडूंत १५ चौकार, एका षटकारासह १0३ धावांची खेळी करीत संकटमोचकाची भूमिका बजावली. रहाणेचे सात कसोटीतील हे दुसरे शतक ठरले. त्याने भुवनेश्वर कुमार (३६) याच्या साथीने आठव्या गड्यासाठी ९0 धावांची भागीदारी केली.स्टुअर्ट ब्रॉडला चौकार मारत शतक साजरे करणारा रहाणे ८७ व्या षटकात जेम्स अँडरसनचा बळी ठरला. अँडरसनने २२ षटकांत ५५ धावांत ४ गडी बाद केले.शिखर धवनला बाद करून अँडरसन इंग्लंड भूमीवर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही बनला. त्याने फ्रेड ट्रूमन (२२९ गडी) यांचा विक्रम मोडीत काढला. आता अँडरसनच्या नावावर एकूण ३६३ विकेट झाल्या आहेत. त्यात इंग्लंडमधील २३३ बळींचा समावेश आहे. रहाणेलाही त्यानेच स्वत:च्या गोलंदाजीवर बाद केले. चहापानानंतर रहाणे आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी अनुक्रमे २६ व ९ धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला; परंतु मोठी भागीदारी होऊ शकली नाही. धावसंख्येत ५ धावांची भर पडते न पडते तोच बिन्नी बाद झाला. अजिंक्य रहाणेला भुवनेश्वरने चांगली साथ दिली. १0१ चेंडूंत ७ चौकारांसह अर्धशतक पूर्ण करणार्या रहाणे आणि भुवनेश्वर या दोघांनी ५0 धावांची भागीदारी ७५ व्या षटकांत पूर्ण केली आणि एका षटकानंतर भारताचे २00 धावा पूर्ण झाल्या.इंग्लंडने नवीन चेंडू घेऊन ही भागीदारी ८२ व्या षटकांत तोडली. ब्रॉडने भुवनेश्वरला त्रिफळाबाद केले. त्यानंतर ८७ व्या षटकात शतक पूर्ण केल्यानंतर तीनच चेंडूंनंतर रहाणे तंबूत परतला. दिवसअखेर मोहंमद शमी १४ आणि इशांत शर्मा १२ धावांवर खेळत आहेत.
रहाणेच्या शतकाने भारताचा डाव सावरला
By admin | Published: July 18, 2014 12:20 AM